Tushar Gandhi
Tushar Gandhi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संविधान वाचवता येईल, परंतु एकात्मता वाचविण्याचे मोठे आव्हान

Sampat Devgire

संगमेश्‍वर : सध्या भारतात भारतीय संविधान (indian constituency) व एकात्मता (Unity) संकटात आहे. संविधान वाचवता येईल. परंतु, एकात्मता वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. समाज जीवनात सामाजिक दुहीचे विष पेरले जात आहे. त्यामुळे एकात्मतेला धोका निर्माण झाल्याने सामाजिक एकता (Social unity) टिकवण्याचे मोठे आव्हान असल्याचे उद्‌गार महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी काढले. (Tushar Gandhi express worries about nationa & socail Unity)

येथील बोवा दादा समाधी मैदानावर दोधू आनंदा बुवा गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाळासाहेब खरे होते. मंचावर रमेश दाणे, तुषार गांधी, डॉ. शिवाजी हिरे, सामाजिक कार्यकर्ते अजय शहा, सुभाष खरे, प्रसाद हिरे आदी मान्यवर हजर होते.

श्री. गांधी म्हणाले, की खऱ्या कार्यकर्त्याला स्मारकाची गरज नसते. शिक्षण प्रसारसाठीच आयुष्य वेचलेल्या व समर्पित झालेल्या व्यक्तीस विद्यार्थी हेच त्यांचे स्मारक असते. असे असले तरी अशी स्मारके प्रेरक असतात. कारण ती दिशादर्शक ठरतात. शिक्षण प्रसार हेच व्रत बाळगणाऱ्यांचा इतिहास स्फूर्तीदायक असतो. कारण, आजच्या शिक्षण सम्राटांसारखा त्यांनी शिक्षणाचा उद्योग केलेला नसतो.

आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ म्हणत असे की, काही वर्षानंतर गांधींसारखा माणूस होऊन गेला ही बाब येणाऱ्या पिढीस खरे वाटणार नाही. बुवा गुरुजी यांच्या बाबतीतही तसेच म्हटले जाईल. यांची प्रतिमा व कार्य गांधींसारखे होते. सध्या समाज जीवन गढूळ केले जात आहे. माणुसकी संपत चालली आहे. धार्मिक विद्वेष क्रिकेटच्या स्कोरसारखे लोकस्मरणात ठेवू लागले आहेत. देशाच्या विभाजनानंतरही एकतेचे भाव होते. अमृताचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विष बनवीत असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.

साम्ययोग साधनाचे संपादक रमेश दाणे म्हणाले मालेगाव हे हिंदू मुस्लिम समन्वयाचे गाव आहे. सध्या इतिहास पुसून टाकण्याचे काम सुरू असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेब खरे यांनी बोवा गुरुजींच्या कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. भगवान बागूल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ख्यातनाम मूर्तिकार जयप्रकाश तथा भैया जाधव यांचा सत्कार करण्यात आला. ‘प्रकाशाचे झाड’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. राहुल मोरे यांनी स्वागतगीत म्हटले. प्रा. डी. एस. पवार यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्‍वर खरात यांनी सूत्रसंचालन, तर पौर्णिमा खरे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुवर्य बुवा दादा शिक्षण संस्थेचे कर्मचारी, ज्ञानेश्‍वर माऊली वाचनालय, सर्वोदय वाचनालय ,ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, नाथ संप्रदाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT