Uday Samant & Devyani Pharande with Officers
Uday Samant & Devyani Pharande with Officers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Samant News: खोक्याची धास्ती... मंत्री सामंत म्हणाले, `खोक्यात काय ते सांगा`

Sampat Devgire

Nashik News: मागील सरकारच्या काळात वर्षभरात साडेचार हजार तरुणांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ९ महिन्यात १२ हजार ३६० तरुणांना उद्योगासाठी अर्थसाहाय्य दिले आहे. आगामी काळात ३० हजार तरुणांना उद्योजक बनवणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत केला. (Maharashtra Government will increase finance for SSI units)

यावेळी श्री. सामंत (Uday Samant) म्हणाले, लघू उद्योगांना वीस लाखांवरून ५० लाख ते एक कोटींपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा श्री. सामंत यांनी केली. उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त आयुक्त डॉ. माणिक गुरसळ, उद्योग विभागाचे अतिरिक्त संचालक संजय कोरबू, सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील आदी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, की उद्योग विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारा अधिकारी-कर्मचारी कमतरतेचा प्रश्‍न सुटणार आहे. शंभर अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करून ते उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार योजनांतर्गत आणि पंतप्रधान रोजगार योजनांतर्गत, स्टार्टअप, खादी ग्राम योजनांतर्गत विविध लघू उद्योग उभारून आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी चालना मिळणार आहे. नवीन उद्योग उभारू इच्छिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विविध प्रकारची मदत केली जाते. त्यानुसार सरकार गतिमान निर्णय घेत आहेत.

श्री. कुशवाह म्हणाले, की आगामी काळात विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष सवलतीचे पॅकेज उपलब्ध होण्यासाठी १० नवे धोरण तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकर नवे धोरण येणार आहे. त्यामुळे उद्योग वाढीबरोबर उद्योग विस्ताराला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच मैत्री पोर्टलच्या माध्यमातून सध्या १२६ सेवा दिल्या जातात. या सेवा वाढणार आहेत. त्यातून उद्योजकांना तत्काळ परवानगीसह इतर सुविधा उपलब्ध होतील. शिवाय निर्यातवृद्धीसाठी प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना वर्षाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री रोजगार योजनांतर्गत ४ हजार १२७ प्रकरण मंजूर करून १३१ कोटींचे अर्थसाहाय्य दिले. त्यात अमरावती, अकोला, यवतमाळ, धाराशिव या जिल्ह्याने शंभर टक्के लक्ष पूर्ण केल्याने या केंद्रांच्या अधिकाऱ्यांचा सन्मान श्री. सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे, कार्यकारी अभियंता जयंतराव बोरसे आदींसह राज्यातील जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

नाशिकमध्ये प्रकल्प प्रस्तावित

नाशिकमध्ये रिलायन्स फार्माची चार हजार कोटींची आणि पिऱ्यामल फार्माची बाराशे कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. अजूनही काही प्रकल्प प्रस्तावित आहेत, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली. ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘आयमा’चे अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, जगदीश पाटील आदींसह उद्योजकांनी श्री. सामंत यांची भेट घेतली. (Political Short Videos)

खोक्यात काय ते सांगा

स्वागतावेळी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी भेटवस्तू दिली. हाच धागा पकडून श्री. सामंत यांनी आपणाला खोका दिला अशी चर्चा होईल, असे सांगत खोक्यात काय दिले हे सांगा म्हणजे चर्चेला पूर्णविराम मिळेल, असे सांगताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला. (Latest Maharashtra News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT