Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : आक्रमक वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर जरांगे, भुजबळांना उद्देशून विखेंचं विधान, म्हणाले....

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देत ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे पाटील तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. शिवाय दोघांकडूनही वादग्रत आणि काहीशी स्फोटक वक्तव्ये समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यात बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी चिंता व्यक्त केली आहे. शासनाने जरांगे पाटलांना मुदत दिलेली आहे, त्यामुळे त्यांनी मुदत पूर्ण होईपर्यंत वाट पाहिली पाहिजे. त्याचबरोबर शासनाची ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची स्पष्ट भूमिका असताना, छगन भुजबळ यांनी विनाकारण समाजात वातावरण बिघडेल असे वक्तव्य करू नये, असे विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देत त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांचा राज्यातील नऊ दिवसांचा दौरा काल संपला. त्याचबरोबर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या वतीनेही आता मेळावे सभा घेण्यास सुरुवात झालेली आहे.

एकूणच दोन्ही बाजूने होणाऱ्या सभा-मेळाव्यातून होणारी भाषणे एकमेकांना लक्ष्य करत आहेत. जरांगे-भुजबळ यांचा एकमेकांवर टोकाच्या टीका सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी समाजाच्या मेळाव्यात बोलताना जरांगेंवर कडक शब्दांत केलेली टोलेबाजी दिसत आहे.

यानंतर एकूणच राज्यातील दोन समाजातील वातावरण कुठे बिघडते की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी जरांगे पाटील आणि त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांना संयमाचा सल्ला देत कान टोचले आहेत, असे म्हणावे लागेल.

याबाबत नगरमध्ये बोलताना राधाकृष्ण विखे यांनी जरांगे पाटील आरक्षणाची मागणी करत आहेत, त्याला सरकारची सहमती आहे. उलट सरकारने इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ हे स्पष्ट केले आहे. यासाठी जानेवारीपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी थोडा संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळे जरांगे पाटलांना विनंती आहे की, त्यांनी वैयक्तिक टीका करण्यापेक्षा सरकारने आश्वासन दिलेले आहे त्याच्या पूर्ततेची वाट पाहावी. कोण काय म्हणत मागणी करतं, याचा विचार त्यांनी न करता संयम पाळावा, अशी अपेक्षा विखे पाटलांनी जरांगे पाटलांकडून केली आहे.

छगन भुजबळ यांनीही अंबड येथील ओबीसी मेळाव्याचे निमित्ताने एकदम उठाव केल्यासारखं वाटले. त्याची आवश्यकता नव्हती. सरकारने स्पष्टपणे ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली असती, तर मग भाग वेगळा होता. सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ती छगन भुजबळ यांनाही माहीत आहे.

सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही, त्यामुळे उगाच आवश्यक नसलेली वक्तव्ये केल्याने समाजात मतभेद निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम समाजावर होतो आणि त्यातून सामाजिक शांतता बिघडते, याची काळजी भुजबळ यांनीही घेतली पाहिजे, असे आवाहन विखे यांनी केले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT