Sanjay Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Chavan on State Govt : संजय चव्हाणांचे राज्य सरकारला आवाहन; म्हणाले "विकासकामे थांबवा पण..."

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : बागलाण तालुक्यात मॉन्सूनपूर्व पाऊस, वादळी वारा व गारपिटीने थैमान घातले आहे. तालुक्यात मंगळवारी (दि.२३) झालेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी बुधवारी (ता. २४) या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारने विकासकामे बाजूला ठेवा, पण शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

बागलाण (Baglan) तालुक्यात काल दुपारनंतर जुनी शेमळी, नवी शेमळी, आराई, नागझरी, किरायतवाडी, कॅनॉल चौफुली आदी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात शेतीपिकांचे १०० टक्के नुकसान झाले. अनेक घरांचे पत्रे उडाले. परिणामी शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. महावितरणचे तब्बल ८० ते ९० खांब आणि ट्रान्सफार्मर जमीनदोस्त झाले आहेत. पशुधनाचे नुकसान झाले आहे. अनेक झाडेही उन्मळून पडले आहेत. उघड्यावरील कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा चाळ, फळबागाही जमीनदोस्त झाल्या आहेत.

या भागाची पाहणी करून माजी आमदार संजय चव्हाण (Sanjay Chavan) व केशव मांडवडे यांनी शेतकर्‍यांचे सांत्वन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या मदतीने नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे आवाहन माजी आमदार चव्हाण यांनी केले. त्यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे केली.

माजी आमदार चव्हाण म्हणाले की, "दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) बागलाणला भेट देऊन आठ दिवसात मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाकडून अद्यापही शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून मात्र शेतकर्‍यांची क्रूर थट्टा सुरू आहे. येत्या निवडणुकांमध्ये या सरकारला शेतकरी त्यांची जागा दाखवून देतील. एकवेळ विकासाची कामे बाजूला ठेवा, पण शेतकऱ्यांना आधी मदत करा."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT