Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : पालकमंत्री भुसेंच्या शिष्टाईला यश; १३ दिवसांनंतर कांदा व्यापाऱ्यांचा संप मिटला

Deepak Kulkarni

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांची बैठक घेऊन अखेर तोडगा काढल्याने तब्बल १३ दिवसांनंतर मंगळवारपासून कांदा लिलाव पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्क मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून लिलाव बंद ठेवले होते. या विषयावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुंबईत बैठक घेतली. कांदा निर्यातीवरील कर रद्द करावा (Nashik) आणि वाहतुकीला अनुदान द्यावे, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून लिलाव बंद आंदोलन सुरू आहे. त्याबाबत मुंबईनंतर आज दिल्लीत बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही.

त्याच दिवशी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीही व्यापाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. पण व्यापाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी बंद कायम ठेवला. अखेर विंचूर उपबाजार समितीपाठोपाठ निफाड बाजार समितीने लिलाव सुरू केले. त्यामुळे व्यापाऱ्यांवर दबाव वाढत असल्याने त्यांनी पालकमंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी चर्चा केली.

या चर्चेअंती तोडगा निघाल्याने व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील १७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमितपणे सुरू होतील. दहा दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद असताना त्याबाबत तोडगा काढण्यात सरकारला यश आले नव्हते. आंदोलन मागे घेण्यासाठी मुंबईपाठोपाठ दिल्लीत जोरदार बैठका पार पडल्या होत्या. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांच्या या प्रश्नांची झळ आता थेट शेतकऱ्यांना बसत होती.(Onion Protest)

‘नाफेड’च्या कांदा खरेदीसंदर्भात या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीत काय निर्णय होतो, यासाठी व्यापाऱ्यांनी शुक्रवारऐवजी शनिवारी बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लिलाव कधी सुरू होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

दरम्यान, गणेश विसर्जनाचा मुहूर्त साधत विंचुर बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू करण्यात आले. बंदनंतर पहिल्याच दिवशी ३० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त २४०० रुपये दर मिळाला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT