Shivsena UBT Vs BJP News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला त्याच्या कामकाजाच्या पद्धतीची किंमत नाशिकमध्ये मोजावी लागली आहे. या पक्षाने ज्यांना सर्व काही दिले अशा दोन नेत्यांनी एकाच वेळी पक्षाला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे हा राजकीय धक्का राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर आणि दुसरे माजी मंत्री बबन घोलप यांनी मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश केला. भाजपकडे असलेल्या सत्तेच्या प्रयोगांपुढे या नेत्यांनी शरणागती पत्करली. हे करताना भाजपला अनपेक्षित पणे एक मोठा लाभ निवडणुकीआधीच झाला आहे.
नाशिक महानगरपालिका कर्मचारी सेना ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची अंगीकृत संघटना आहे. महापालिकेचे दीड हजार कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात आणि दैनंदिन कामकाजात शिवसेना ठाकरे पक्षाला तो एक मोठा आधार मानला जात होता.
या पक्षाचे अध्यक्ष यापूर्वी बंटी तिदमे हे होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. या संघटनेवर वर्चस्व मिरविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जंग जंग पछाडले होते. मात्र कर्मचाऱ्यांनी एकमुखी शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा देत तो प्रयत्न यशस्वी केला. संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सध्या मात्र राजकीय चित्र आणि वातावरण पाहता वारे उद्धव ठाकरे पक्षाच्या विरोधात वाहत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षांनी राज्यातील सत्तेचा पुरेपूर उपयोग करीत शिवसेना ठाकरे पक्षाला साम दाम दंड भेद या नीतीचा उपयोग करून नेत्यांची तोडफोड केली आहे. यामध्येच पोलीस कारवाईचा बडगा टाळण्यासाठी उपनेते बडगुजर हे भाजप सोबत गेले आहेत. त्याचा राजकीय परिणाम आत्तापासूनच जाणवू लागला आहे.
सुधाकर बडगुजर हे शिवसेनेच्या मनपा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत. ते भाजपच जाणार या चर्चेने संघटनेवर वर्चस्व कोणाचे यावरून आठवड्यापूर्वीच बाद सुरू झाला होता. संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री बबन घोलप यांनी आपल्याकडेच सर्व अधिकार असल्याचा दावा केला होता.
आठवड्याभरातच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी राजकीय भूमिका बदलली. त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याचा या संघटनेच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. श्री. घोलप यांनी यू टर्न घेत स्वतःच भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अध्यक्ष बडगुजर आणि संस्थापक अध्यक्ष घोलप दोघेही भाजपवासी झाल्याने संघटनेचे नियंत्रण आपोआपच भाजपकडे गेले आहे
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.