Nandgaon News: नांदगाव मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे उमेदवारी करत आहेत. त्यांना महायुतीचे बंडखोरा व अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांसह अपक्ष उमेदवारांचा सामना करावा लागत आहे.
नांदगाव मतदार संघात सर्वाधिक ३४ उमेदवारांनी ४२ अर्ज दाखल केले आहेत. आज झालेल्या छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता या मतदारसंघात ३२ उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असे चित्र आहे.
नांदगाव मतदारसंघाची निवडणूक एक सामाजिक प्रयोग म्हणून पाहिली जात आहे. ही निवडणूक विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेचा विषय आहे. त्याला भुजबळ आणि कांदे यांच्या राजकीय वादाची किनार आहे.
महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार कांदे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश धात्रक विरोधात उमेदवारी करीत आहेत. हे दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देऊन या मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली. हे दोन्ही प्रबळ उमेदवारी परस्परांशी संघर्ष करीत आहेत.
आता मंगळवारी शेवटच्या क्षणी नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ रोहन बोरसे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला. देवदूत अशी प्रतिमा असलेल्या डॉ बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जामुळे नांदगावचे राजकीय वातावरण आणि समीकरण दोन्हीही बदलण्याचे संकेत आहेत.
या मतदारसंघात भुजबळ विरुद्ध कांदे ही अर्थात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत निर्माण झाली होती. त्यात तिसरे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार धात्रक हे देखील ओबीसीच आहेत. मात्र त्यांना समाजाच्या आणि पक्षाच्या नेत्यांचाही पाठिंबा होता.
डॉ बोरसे यांनी उमेदवारी केल्यानंतर धात्रक यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील किती घटक पक्ष शेवटपर्यंत तग धरतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांना सध्या मराठा महासंघाचा पाठींबा आहे. डॉ बोरसे हे नांदगाव चे स्थानिक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
नांदगावचे स्थानिक उमेदवार म्हणून डॉ बोरसे यांच्याकडे पाहिले जाते. ते डोईजड होतील याची जाणीव झाल्याने ते स्पर्धेत येऊच नयेत, अशी पुरेपूर राजकीय व्यवस्था सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली होती. डॉ बोरसे यांनी राजीनामा दिल्यानंतरही जिल्हा स्तरावर त्याला मंजुरी देण्यास टाळाटाळ होत होती.
जिल्हा प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या आणि नेत्यांच्या दबावानंतर त्याला मंजुरी दिली. या मंजुरीनंतर मंत्रालयातून त्याला अडचण निर्माण करण्यात आली. शेवटी मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी घेतली. त्यात राज्य शासनाने राजीनामा मंजूर करीत असल्याचे लिखित स्वरूपात कळविले. त्यानंतरच डॉक्टर बोरसे उमेदवारी अर्ज दाखल करू शकले.
माजी खासदार भुजबळ यांनी आमदार कांदे यांच्यावर गुंडगिरी आणि दहशत निर्माण करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भयमुक्त नांदगाव अशी घोषणा माजी खासदार भुजबळ यांनी दिली आहे. या दोन्ही प्रबळ नेत्यांमध्ये डॉ बोरसे हे थर्ड फॅक्टर म्हणून चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.