Suhas Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhas Kande : 'एवढे लोक मेले'... आमदार सुहास कांदे सभागृहात आक्रमक, नेमकं काय घडलं?

Suhas Kande slams highway negligence in Manmad, raises concerns over fatalities on Indore–Pune National Highway in Maharashtra Assembly : आमदार कांदे म्हणाले या रस्त्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून भांडतो आहोत. मनमाड शहराचा हा त्रास कधी कमी होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Ganesh Sonawane

Maharashtra Assembly Monsoon Session : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मनमाडमधून जाणाऱ्या इंदूर -पुणे या राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली वाहतूक व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, सातत्याने होणारे अपघात व शेकडो नागरिकांचा झालेला मृत्यू पाहाता या मार्गाला बाह्यवळण रस्ता करावा किंवा शहरातून मोठा उड्डाणपूल उभारावा अशी मागणी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत केली.

यावेळी सुहास कांदे म्हणाले, माझं मनमाड शहर हे दीड लाख लोकसंख्येचे आहे. हे शहर अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असून या शहरातून पुणे-इंदूर राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच नाशिक जिल्ह्यातील छत्रपती संभाजी नगर, शिर्डी व जळगाव या दिशांना जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मालेगाव चौफुली परिसरात प्रचंड वाहतुक होते. रहदारी प्रंचड होते. मनमाडला ऑइल कंपन्या आहेत. कमीतकमी २५ हजार गाड्या रोज या मार्गाने मनमाड शहरातून मध्यभागातून ये-जा करतात. याच्यावर एक पूल आहे, तो पूल सुद्दा ६० वर्ष जुना आहे. दोन वर्षांपूर्वी तो पूल ढासळल्याने मोठा अपघात झाला, हा पूल कमकुवत झाला असून धोकादायक असल्याचे आमदार कांदे म्हणाले.

रुग्णवाहिका, गरोदर महिला, अनेक वृद्ध नागरिक, व्यापारी यांना या मार्गावरुन जाताना त्रास होतो. आता पर्यंत गेल्या चार वर्षांत कमीतकमी शंभर जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. २०२२ मध्ये २१ अपघात झाले. त्यात १२ मयत झाले. २०२३ ला १५ अपघात झाले त्यात २० मयत झाले. २०२४ मध्ये १० अपघात झाले त्यात २० जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सांगायला दु:ख होतं माझ्या मतदारसंघातील अनेक कुटुंब उद्धस्त झाले. अनेक अपघातात अपंग झाले, हे सगळं झालं ते केवळ या रस्त्यामुळे झालं. एका व्यापाऱ्याच्या घरातील तीन जणांचा अपघातात मृत्यू झाला.

या रस्त्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून भांडतो आहोत. मनमाड शहराचा हा त्रास कधी कमी होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा त्रास कमी करण्यासाठी या मार्गाला बाह्यवळण रस्ता करावा लागेल, त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. आणि तो होत नसेल तर कमीत कमी मालेगाव चौफुली पासून ते ट्रेनिंग कॉलेजपर्यंत एक चांगला उड्डाणपूल उभारावा अशी मागणी त्यांनी केली.

या मुद्द्यावर शासन सकारात्मक असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या रस्त्याच्या नव्याने उभारणीसाठी डीपीआर तयार केला जात आहे. तो पूर्ण झाल्यानंतर आमदार कांदे यांना सोबत घेऊन उच्चस्तरीय बैठक घेत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर देताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT