Sujay Vikhe, Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Sujay Vikhe : दोघेही महायुतीचे तरीही...; नीलेश लंके आयोजित कार्यक्रमावरून विखे म्हणाले...

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

महायुतीचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी नगरमध्ये आयोजित केलेल्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यावर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम घेत नाही,' असा टोला खासदार विखे यांनी आमदार नीलेश लंके यांना लगावला आहे.

केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवल्यानंतर नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती येथील कांदा मार्केटमध्ये खासदार विखे (Sujay Vikhe) यांचा सत्कार करण्यात आला. कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि खासदार सुजय विखे यांनी विशेष प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे यासाठी वारंवार बैठका घेतल्या. यानंतर कांद्यावरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठवली.

यानिमित्ताने नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नेप्ती कांदा मार्केटमध्ये खासदार विखे यांचा सत्कार केला. या वेळी माजी आमदार नगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, नगर दक्षिण युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले उपस्थित होते. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी नगर शहरामध्ये आयोजित केलेल्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्यावर खासदार विखे यांनी सावध प्रतिक्रिया दिली.

खासदार विखे म्हणाले, 'प्रत्येकाला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे. मीदेखील सांस्कृतिक कार्यक्रम घेतले आहेत. नगरमधील महासंस्कृतिक कार्यक्रम हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. आपण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कुठलाही कार्यक्रम घेत नाही. वर्षानुवर्षे बचत गट मेळावा, सांस्कृतिक मेळावा झाले आहेत. यावर्षीदेखील होईल पुढील वर्षीदेखील होईल. आज कोणी सांस्कृतिक कार्यक्रम घेत असेल, तर उद्या दुसरे कोणीही घ्यावा. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे'. माझा कार्यक्रम नाही. त्यामुळे मी त्यावर का बोलू?, असेही खासदार विखे या वेळी म्हणाले.

पाठपुरावा करावा लागतो - विखे

कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) उठवण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले. निर्यातबंदी उठणार, या बातमीनंतर कांद्याचे भाव वाढले. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. हीच मोदी गॅरंटी आहे, असे सांगून नुसते निवेदन देऊन प्रश्न सुटत नाही. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, असा टोलाही खासदार सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT