MP Sujay Vikhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe : ''काहींना विखे पाटलांची साखर लागेल कडू'' खासदार सुजय यांनी लगावला टोला!

Sujay Vikhe News : सुजय विखेंनी हा टोला नेमका कुणाला लगावला यावर जिल्ह्याती चर्चा सुरू झाली आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता-शिर्डी तालुक्यात सध्या दीपावली सणाचे औचित्य साधून विखे परिवाराकडून साखर वाटप सुरू आहे. यात एक लाख कुटुंबांना प्रत्येकी 5 किलो साखर मोफत दिली जात आहे.

या मोफत साखर वाटपाच्या कार्यक्रमाची सर्व सूत्रे खासदार सुजय विखे यांच्या हातात असून बहुतांशी कार्यक्रमांना ते स्वतः वैयक्तिक उपस्थित राहून विखे परिवाराची भूमिका मांडताना राहाता-शिर्डीचा गड अजून पक्का करून घेत आहेत. अशाच एका कार्यक्रमात खा.सुजय विखे यांनी 'काहींना आमची साखर कडू लागेल' असे वक्तव्य केल्याने सुजय विखेंनी हा टोला नेमका कुणाला लगावला यावर चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहत्यात अशाच एका कार्यक्रमात खासदार विखेंची नागरिकांच्या वतीने लाडू तुला करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार विखे यांनी, मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्याने सुरु आहे. दिवाळी निमित्त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल. असा टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध गावांमध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. राहाता शहरातही आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार विखे पाटील यांनी साखर वितरण करुन, उपस्थितांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

गणेश कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांना २७०० रुपये भाव दिल्याबद्दल तसेच ५ किलो साखरेची भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांची लाडूतुला करण्यात आली. गणेश कारखाना ताब्यात घेतल्या नंतर आमदार बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवानेते विवेक कोल्हे यांनी गणेशच्या उत्पादक आणि अनुउत्पादक सभासदांना 10 किलो साखर मोफत वाटण्याची घोषणा केली. एकूणच सध्या राहाता-शिर्डी परिसरात थोरात-कोल्हे आणि विखे परिवाराकडून सुरू असलेल्या साखर पेरणी नंतर मोठी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे सुजय विखे दक्षिण नगर जिल्ह्याचे खासदार असताना मोफत साखर वाटप उत्तर नगर जिल्ह्यातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघात होत असल्याने आणि खासदार सुजय विखे त्यात हिरीरीने भाग घेत असल्याने दक्षिण नगर जिल्ह्यातील विखे विरोधकांनी टीका सुरू केली आहे. त्यामुळे राहत्यात सुजय विखे यांनी आपल्या भाषणात आपली साखर काहींना कडू लागेल, या अर्थाने केलेले वक्तव्य पक्षातीलच चिंतातुर व्यक्तीं साठी होते की थेट राजकीय विरोध करणाऱ्या पक्षांतील नेत्यांसाठी होते यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

आपलीच काही लोकं मतदारसंघात सोयीसुविधां प्रश्न उपस्थित करून त्या बद्दल चर्चा घडवून आणतात. यावर सुजय विखे यांनी भाष्य करत काहींना आपली साखर कडू लागेल असे म्हणतानाच मोफत साखर वाटप उपक्रमावर टीका करणाऱ्यांना सुद्धा लक्ष केलेय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT