Sujay Vikhe Emotional Reaction After Election Defeat -लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक धक्कादायक निकाल लागले. त्यापैकी एक सर्वात मोठा निकाल होता तो अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा. या ठिकाणी भाजपच्या सुजय विखे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नीलेश लंके यांनी पराभव करून सर्वांनाच धक्का दिला होता.
कारण, या सुजय विखे यांच्या सारखा तगडा उमेदवार नीलेश लंके सारख्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटत नव्हतं. मात्र निकाल काही वेगळाच समोर आला. खरंतर या निकालावर विखेंकडून या आधीच आक्षेप घेण्यात आलेला आहे. तर आता ’सरकानामा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सुजय विखेंनी त्या पराभवावर एक वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.
सुजय विखे म्हणाले, ‘’एक जर लोकसभा निवडणुकीचा अपवाद जर सोडला, तर मी आयुष्यात अपयश कधीही पाहिलेलं नाही. लोकसभेचं अपयश हे माझं अपयश मी मानत नाही. परिस्थिती तशी होती तो दोष परिस्थितीचा आहे. ना मतदारांचा आहे, ना माझा आहे. राजकीय परिस्थिती बदलते, परत बदलली आहे आणि परत आपण या राजकीय व्यासपटलावर उभारी घेतली.’’
यावर बोलताना ‘’मला काहीच वाटलं नाही. लोकांना आश्चर्य वाटे,. कारण लोकांना वाटलं असणार दु:खी झाला. लोकांना वेदना झाल्या कारण एक कार्यकर्ता पडतो. नेता पडला तर कार्यकर्त्यांना त्याचं दु:ख होणं स्वाभाविकच आहे. त्यांच्या दु:खात जर मी अजिबातच निरागस पद्धतीने बसत राहिलो तर ते चुकीचं होतं.’’ असं सुजय विखे यांनी सांगितलं.
सुजय विखे म्हणाले, ‘’मलाच आश्चर्य वाटलं, मी कुणाचा तरी पॉडकास्ट बघितला ज्यात म्हटलं होतं, की नऊ मोबाईल फोडले. अरे मी एकच मोबाईल उचलत नाही कुणाचा. नऊ मोबाइल कशासाठी ठेणार आहे, साधी गोष्ट आहे. मलाही या गोष्टाचं हसू आलं, की नऊ मोबाइल फोडले किंवा मी फार चिडलो वैगेरे.. पण मी एक गोष्ट सांगतो, मला काहीच भावना नव्हती, अक्षरशा एक थेंबही माझ्या डोळ्यातून पडला नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेऊन हे सांगू शकतो. मी रडलो सुद्धा नाही. मला त्या गोष्टीत काही रस नाही. मात्र ते(विरोधक) हवेत गेले आणि म्हणून विधानसभेला तो दिवस पाहावा लागला.’’
याशिवाय, ‘’माझं आपलं जे सुरू आहे, ते सुरूच आहे. आजही आमची सत्ता आली, अजून वर्षही झालं नाही. वडील पालकमंत्री आहेत. तरी मी माझं काम करतोय, लोकांना भेटतोय. मी या विचाराचा माणूस आहे की, मला चार वर्षे काम करायची सवय आहे, शेवटच्या वर्षीच नाही. मी माझं ही जर लोकसभा जर सोडली, तर या अगोदरच्या माझ्या वडिलांच्या प्रत्येक विधानसभेच्या मतदानाच्या एक दिवस आधी मी चित्रपट बघतो. मी मतदानाच्या दिवशी माझा फोन बंद करतोच, करतो. कधीही बुथवर जात नाही. मी फार वेगळ्या विचाराने राजकारण करतो. चार वर्षे हे तुमचे असतात, शेवटचं वर्षे हे विरोधकांचं असतं. त्यामुळे चार वर्षे कामंचं एवढी करायची की पाचव्या वर्षी विरोधक जन्मालाच येत नाही.’’अशा शब्दांत सुजय विखे यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.