Maharashtra Politics : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरुन काढण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या विराजमान होण्याची शक्यता असून जवळपास त्यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते आहे. राष्ट्रवादी पक्षात सुरु असलेल्या वेगवान हालचाली पाहाता आता केवळ गटनेता निवड अन् शपथविधीची औपचारिकता बाकी असल्याचे सांगितले जात आहे.
सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या जागी उपमुख्यमंत्री करण्यात यावे अशी मागणी पक्षातूनच पुढे आली असून पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ व आमदार माणिकराव कोकाटे यांनी तसे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने सूनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं समजत आहे.
उपमुख्यमंत्री पदाची जागा खाली आहे, ती सुनेत्रावहिनींद्वारे भरता येईल याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे. विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी उद्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यात सुनेत्रा वहिनींना सीएलपी नेता अर्थात विधानमंडळ पक्षाचं प्रमुख केलं जाईल. जे पद अजितदादांकडे होते ते सूनेत्रा वहिनी यांना देण्याचा निर्णय होईल. कदाचित एकमत झालं तर उद्याच शनिवार (दि.३१ जानेवारी) शपथविधी होऊ शकतो, अशी शक्यता देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
तसेच आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील म्हटलं आहे की, सर्वांची एकच इच्छा आहे, की सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं. त्यासाठी आमच्या आमदारांची बैठक घेण्याची गरज नाही. अजितदादा हेच आमच्यासाठी पक्ष होते. नेता निवडीबाबत आमचे सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्रा पवार यांना करावे, पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे द्यावी. मी अनेक आमदारांशी बोललो, सर्वांचं एकमुखी म्हणणं की सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभे राहायला हवं. आम्ही एका मताने ठराव करणार आहोत. सुनेत्रा वहिनींनी आमचं, पक्षाचं नेतृत्व करावं. दादांची खाती देखील त्यांनी सांभाळावी असं कोकाटे यांचे म्हणणे आहे. यासाठी एकमुखाने आम्ही ठराव करणार आहोत. आम्ही दोन पत्र तयार करणार आहोत, एक पक्ष आणि निवडणूक आयोगाला देणार आहोत. आम्ही एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहोत, त्यांच्याकडेच पक्षाचे नेतृत्व देणार असल्याचं कोकाटेंनी स्पष्ट केलं.
त्यामुळे आता उद्याच्या अर्थात शनिवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्व आमदारांची ही बैठक होणार आहे. या बैठकीत सूनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता असून पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाईल. ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. कुठलीही जय्यत तयारी न करता अत्यंत साधेपणाने हा शपथविधी घेतला जाईल. या शपथविधीनंतर सूनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. यासह सुनेत्रा पवार यांच्या रुपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.