Deputy CM Sunetra Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunetra Pawar : आपल्या वहिनी आहेत ना ! सुनेत्रा पवारांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात नाशिकच्या अधिवेशनातून होणार, तारीख ठरली

NCP Nashik Adiveshan : दिवंगत नेते अजित पवार यांच्या पश्चात होणारे राष्ट्रवादीचे हे पहिलेच अधिवेशन असून या अधिवेशनाच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांना पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.

Ganesh Sonawane

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर पक्षाची जबाबदारी माजी खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर आली. सुनेत्रा पवारांनी पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर आता पक्षाचे पहिलेच राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये होणार आहे.

नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात रविवारी (दि. २७ सप्टेंबर) पक्षाचे एक दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून त्यासाठी तयारी सुरु झाली आहे. या शिबिरामध्ये सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहे. त्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, महानगर, प्रदेश यातील प्रमुखांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

आपल्या व वहिनी आहेत ना!

नाशिकमधील या अधिवेशनाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांची पक्षातील नेतृत्वाची प्रतिमा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार हयात असताना 'एकच वादा, अजित दादा' ही घोषणा लोकप्रिय झाली होती. पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमात ही घोषणा कार्यकर्त्यांच्या तोंडी असे आणि बॅनरवरही अशी घोषणा लिहिली जात असे.

मात्र आता 'आपल्या वहिनी आहेत ना!' या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्रभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते'. आपल्या वहिनी आहेत ना!' या घोषणेसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता पक्षाचा मुख्य चेहरा बनतील.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची जबाबदारी आली. त्या राजकारणात नवख्या असल्याने त्यांना ही जबाबदारी कितपत सांभाळता येईल याविषयी अनेक स्तरांवरून प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर पक्षातील अंतर्गत धुसफूस देखील समोर आली.

मात्र, आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात स्वतःला मजबूत करण्यासाठी नव्या मोहिमेसह मैदानात उतरत आहे. त्याचाच भाग म्हणून हे अधिवेशन आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भविष्यातील पक्षाची दिशा निश्चितीच्या दृष्टीने हे अधिवेशन राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आणि निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये भुजबळ नॉलेज सिटी येथे अधिवेशन होणार असले तरी त्याची प्राथमिक तयारी मुंबईमधून झाली आहे. नाशिकला इथेच (भुजबळ नॉलेज सिटीमध्ये) झालेल्या मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा चांगला अनुभव असल्याने अधिवेशन चांगलेच होईल. माझ्यासह सर्व प्रमुख नेतेदेखील आयोजनात लक्ष घालत असल्याची माहिती पक्षाचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

नाशिकची निवड का महत्त्वाची?

दिवंगत नेते अजित पवार यांचे नाशिकशी घनिष्ठ नाते होते. नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून जिल्ह्यातील एकुण पंधरा पैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत. पक्षाची ग्रामीण भागात चांगली पकड आहे.

नाशिकमध्ये असलेली पक्षाची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक राजकीय प्रभाव लक्षात घेता राज्यव्यापी शिबिरासाठी नाशिकची निवड करण्यात आल्याचं लक्षात येतं. नाशिकला २७ सप्टेंबरला हे अधिवेशन होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT