Nashik Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुनिल बागुल व मामा राजवाडे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र, यादरम्यान बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशिकमध्ये गंभीर गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक अटळ असल्याने दोघे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावरुन संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरुन भाजपने पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी दोघांचा पक्षप्रवेश थांबवला होता.
मात्र, त्यानंतर काही दिवसांत दोघांवरील दाखल गुन्हा पोलिसांनी अचानक मागे घेतला. त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार तक्रारदार गजू घोडके यांनी नाट्यमयरित्या मागे घेतली. या निर्णयामुळे बागुल आणि राजवाडे यांना दोघांना दिलासा मिळाला असून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. यासंदर्भात एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना सुनिल बागुल यांनी महत्वाची अपडेट दिली आहे.
सुनील बागुल म्हणाले की, आमच्यावर दाखल असलेला गुन्हा पूर्णपणे संपवावा लागेल. गुन्ह्याचं स्वरूप संपेपर्यंत आम्हाला थांबावं लागेल, असे सांगण्यात आले होते. सुरु असलेलं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आमचा प्रवेश नाशिकला घ्यायचा की मुंबईला घ्यायचा? त्यातल्या त्यात नाशिकला प्रवेश घेतला तर कोण नेते पाहिजे? या संदर्भात सध्या चर्चा सुरू असल्याचे बागुल यांनी सांगितले आहे.
अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल. तुम्हाला नाशिकमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नाशिकमध्ये किंवा मुंबईत प्रवेश हवा असेल तर मुंबईमध्ये प्रवेश सोहळा घेतला जाईल. असे भाजपा पक्षाकडून सांगण्यात आल्याची माहिती सुनील बागुल यांनी दिली आहे. तर अधिवेशन संपल्यानंतर एक आठवड्याच्या आत मी, बाळा पाठक, अजय बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये आणि इतर काही नगरसेवकांचा एकत्र भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बागुल म्हणाले. त्यामुळे आता सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश निश्चित असून तो अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात होणार आहे. फक्त नाशिकमध्ये की मुंबईमध्ये प्रवेश होणार? एवढाच निर्णय घेणे बाकी आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, विलास शिंदे हे शिवसेना (शिंदे ) पक्षात घेल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करत मामा राजवाडे यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर नाशिक पोलिसांनी एका मारहाण व दरोडा प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी राजवाडे व बागुल दोघेही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे कळताच उद्धव ठाकरेंनी दोघांची पक्षातून हकालट्टी केली होती.
त्यानंतर संजय राऊत यांनी एक्सपोस्ट करत भाजपवर टीका केली होती. नाशिक मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले... क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार व भाजपा साठी गुन्हेगार असलेल्या लोकांना भाजप पक्षात घेत आहे. म्हणजे तुमच्यावर गुन्हे दाखल असले तरच भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळतो. असं ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यानंतर टीका होऊ लागल्याने बागुल व राजवाडे यांच्या भाजपप्रवेशाला ब्रेक लागला होता. त्यामुळे ना शिवसेनेत ना भाजपात अशी अवस्था दोघांची झाली होती. त्यानंतर तक्रारदार गजू घोडके यांनी तक्रार मागे घेतल्याने सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांचा भाजपमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.