Sule Vs BJP : नाशिक हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येऊ लागले आहे. रोज होणाऱ्या मोठ्या आणि धक्कादायक घडामोडींनी येथील राजकारण ढवळून निघाले आहे. नाशिकचा एक मोठा प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या चर्चेने त्यात नवी भर पडली आहे.
नाशिक हे राज्यातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे. मात्र गेली दहा वर्ष राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार असूनही पदरात काही पडलेले नाही. नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. मात्र एकही नवा प्रकल्प येऊ शकलेला नाही.
सामान्य नागरिकांच्या मनातील ही खदखद आहे. या अस्वस्थतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स वर केलेल्या एका पोस्टने मोठा स्फोट झाला आहे. राज्यातील महायुतीचे सरकार या पोस्टने खडबडून जागे झाले.
खासदार सुळे यांची पोस्ट थेट राज्य सरकारच्या मनोभूमिकेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सध्या राज्यातील महायुतीच्या सरकारवर महाराष्ट्राच्या हिताऐवजी शेजारच्या राज्यासाठी काम होत असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळेच नाशिकच्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनीही त्याचा धसका घेतला नसता तरच नवल.
खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकचे प्रमुख केंद्र असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने एका प्रकल्पासाठी २५ हजार कोटींचा करार केला होता. इलेक्ट्रिक वाहनांचा हा प्रकल्प नाशिकला अपेक्षित होता. नाशिक परिसरात त्यासाठी तयारी देखील झाली होती.
मात्र मंजुरीच्या प्रक्रियेत केंद्रातील सरकारने त्यात हस्तक्षेप केला. आता हा प्रकल्प गुजरातला हलविला जाणार असल्याची चर्चा आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणात राज्यातील सरकार काय करीत आहे? असा प्रश्न खासदार सुळे यांनी विचारला .
खासदार सुळे यांच्या या प्रश्नाने नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. हा प्रकल्प नाशिकला झाल्यास नाशिकच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला मोठी चालना मिळेल. मोठी रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प गुजरातला जावा, यासाठी काही केले असेल तर ती महाराष्ट्र आणि नाशिकच्या जनतेशी प्रातरणा ठरेल.
नाशिक हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले शहर आहे. दहा वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला सत्ता द्या, या शहराचा विकास करण्यास मी कटिबद्ध आहे असे म्हटले होते. त्यामुळेच खासदार सुळे यांच्या पोस्टने भाजपच्या अंतर्गत राजकारणात अस्वस्थतेचे तरंग उठले आहेत.
यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही पुढे येऊन प्रतिक्रिया दिली आहे. चाकण येथे दहा हजार कोटी रुपयांचा महिंद्राचा प्रकल्प येणार असल्याची प्रक्रिया आहे. याशिवाय आणखी चार हजार कोटींचा प्रकल्प अपेक्षित आहे. त्यात नाशिकला अडीच हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने पराभवाची भीती वाटू लागल्याने अशा प्रकारे नॅरेटीव्हसेट केले जात असल्याचा राजकीय खुलासा त्यांनी केला.
एकंदरीत नाशिकच्या औद्योगिक नागरी आणि विकासाच्या प्रश्नावर सध्या राज्यातील वरिष्ठ नेते भाष्य करीत आहेत. या प्रश्नांवर पाठपुरावा करीत आहेत. असे असताना महापालिकेपासून तर विधानसभा मतदारसंघात देखील सर्व ठिकाणी भाजप सत्तेत आहे. त्यामुळे खासदार सुळे यांच्या पोस्टने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली नसती तरच नवल.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.