Sushma Andhare in Nagar : 'भाजपमधील अनेक नेत्यांना संपवण्याचे काम भाजप नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या पंकजा मुंडे यांची लोकप्रियता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा काकणभर अधिक आहे. भाजपमध्ये अन्याय सहन करण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेमध्ये यावे. देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील दिग्गज नेत्यांना संपवत आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे मातृतीर्थ ते शिवतीर्थ, अशी पदयात्रा सुरू आहे. ही पदयात्रा आज नगरमध्ये असून, सुषमा अंधारे यांनी या वेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, भगवान फुलसौंदर, दत्ता जाधव, संभाजी कदम, राजेंद्र भगत, गिरीश जाधव, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, प्रवीण कोकाटे उपस्थित होते.
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी वाद लावून दिले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मुनीम म्हणून काम करतात. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वाद सोडवायचा असता, तर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावर गंडांतर येऊ दिले नसते. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याऐवजी ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असती, परंतु फडणवीस यांना मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी या वेळी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये वारंवार अन्याय होत आहे. अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात जास्त गुन्हेगार असतो. पंकजाताई या अन्याय का सहन करत आहेत, हेच कळत नाही. त्यांना पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येण्याचे मी खुले आमंत्रण देते, असे सुषमा अंधारे यांनी या वेळी म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे सुरू केले असल्याचे सांगून, अगोदर विनोद तावडे यांना त्रास दिला. ते त्यांच्या तावडीतून सुटले आणि केंद्रात गेले, यातून त्यांचे भाजपमध्ये वजन वाढले. आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrakant Bawankule ) यांना त्रास देत आहेत. चंद्रकांत पाटील यांनाही ते त्रास देत आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांना दिलेला त्रास सर्वश्रुत आहेत. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले. फडणवीससाहेब यांचे असे झाले आहे की, "घरचे राहिले उपाशी, काँग्रेस-राष्ट्रवादी तुपाशी", असा कार्यक्रम फडणवीस यांचा सुरू आहे. भाजपमधील एक एक नेता संपवण्याचे पाप देवेंद्र फडणवीस करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये पंकजाताई यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा सल्लादेखील सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी या वेळी दिला.
'भाजपमधील नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र अलीकडच्या काळात वापरत असलेली भाषा ही संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी आहे. चिपळूण येथे शिवसेना नेते भास्कर जाधव आणि राणे समर्थकांमध्ये जो राडा झाला, त्याला हीच भाषा कारणीभूत आहे. राणे पिता-पुत्र गेल्या काही दिवसांपासून जी वक्तव्यं करत होते ती राज्यसभेसाठी धडपड होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ती संधी दिली नाही. आमच्या काँग्रेसमधील (Congress) नेत्यांना, सर्वच नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेवर नेऊन न्याय दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते,' असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.