Jalgaon News: 'काँग्रेस पक्ष सोडण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. परंतु काँग्रेस पक्षाने आपल्याशी कोणतीही चर्चा न करता एकाधिकारशाहीने निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाही, त्यामुळे दोन दिवसांत आपण दुसऱ्या पक्षात प्रवेशाबाबत निर्णय घेणार आहोत', असे मत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. आपली कन्या डॉ.केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व त्यांची कन्या केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर काँग्रेसने डॉ.पाटील, त्यांच्या पत्नी डॉ.वर्षा पाटील व युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन केले आहे. या पार्श्वभूमीवरच डॉ.उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदे घेत यावर सविस्तर भाष्य केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी डॉ. पाटील म्हणाले, अयोध्येत आज प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. संपूर्ण देश आनंदात आहे. आपणही या आनंदात सहभागी होतो. आपण आनंद साजरा करून दुपारी घरी आल्यानंतर आपल्याला व आपल्या पत्नीला तसेच देवेंद्र मराठे यांना सहा वर्षासासाठी पक्षातून निलंबीत करण्यात आल्याचे पत्र मिळाले. त्यामुळे अत्यंत वाईट वाटले. गेले अनेक वर्षे काँग्रेसमध्ये कार्य करीत आहोत.
त्यामुळे आपल्याला या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांनी विचारणा करण्याची गरज होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जिल्ह्याच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी चर्चा न करता आपल्यावर ही कारवाई केली. ही चुकीची कारवाई आहे. पक्षाने लोकशाहीला डावलून एकाधिकार पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमधील लोकशाही संपलेली आहे. पक्षाच्या वरीष्ठ नेत्याबाबत आपली नाराजी आहे, असं डॉ.उल्हास पाटील म्हणाले.
काँग्रेस पक्षाने आपल्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे आपल्यासमोर पर्याय नाही. त्यामुळे दुसऱ्या पक्षात प्रवेशाबाबत आपण अद्याप निर्णय घेतला नव्हता. पण आता निर्णय घेणार आहोत. त्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
डॉ.केतकी पाटील या भाजपात प्रवेश करणार आहे. त्या सद्या कोणत्याही पक्षात नाहीत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत देशासाठी जे कार्य केले आहे, ते आवडले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय स्वतंत्र आहे, अशी माहितीही डॉ.पाटील यांनी यावेळी दिली.
(Edited By : Ganesh Thombare)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.