Girish Mahajan-Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thackeray group: गिरीश महाजनांच्या मतदारसंघात ठाकरे गट ॲक्टिव्ह; आंदोलनांचा धडाका

Sampat Devgire

Jamner News: भाजपचे संकट मोचक, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व आहे. महाजन यांच्या इच्छेविरुद्ध भाजपमध्ये पानही हालत नाही. मात्र अचानक त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अँक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना ठाकरे गटाकडून जामनेर मतदारसंघात आंदोलनाचा धडाका सुरू आहे.

शिवसेना ठाकरे गट अचानक आक्रमक झाल्याने तो चर्चेचा विषय आहे. ही आंदोलने अशीच सुरू राहिल्यास गिरीश महाजन यांचे राजकीय स्वास्थ्य अबाधित राहते की, त्यांनाही उत्तर द्यावे लागते याची चर्चा आहे.

गेल्या आठवड्यात जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील दुरावस्थेबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मोठे आंदोलन झाले. त्याची चर्चा थांबत नाही, तोच मंगळवारी जामनेर बस स्थानकाच्या दुरावस्थेबद्दल आंदोलक आक्रमक झाले. २०१८ मध्ये १४ कोटी रुपये खर्चाचे हे बस स्थानक बांधण्यात आले.

बस स्थानकाचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र ते अद्यापही अपूर्ण असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते राहुल चव्हाण यांनी केला. तेथे अनेक असुविधा आहेत. कामे पूर्ण नसल्याने हा निधी कुठे खर्च झाला? असा प्रश्न शिवसेना नेते राहुल चव्हाण यांनी केला आहे.

जामनेर बस स्थानकाच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाने थेट स्थानकात जाऊन आंदोलन केले. अधिकाऱ्यांना दुरावस्थेबद्दल जाब विचारला. ॲड. प्रकाश पाटील, उस्मान शेख, किशन नेर, पवन भोई, युवा सेनेचे नेते विशाल भोई, राहुल पाटील, प्रशांत सुरवडे आदींसह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मतदार संघातील विविध विकास योजनांचे वाभाडे काढण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे हे आंदोलन आणि आक्रमक झालेली शिवसेना ठाकरे गट यामागे काय कारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

ठाकरे गटाच्या या आंदोलनामुळे भाजपचे कार्यकर्तेही या आंदोलनाची चर्चा करीत आहे. थेट राज्याच्या संकट मोचक मंत्र्याच्या मतदारसंघातच त्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाने सुरू केले आहेत. त्यामुळे या आंदोलनाला गिरीश महाजन काय उत्तर देतात, की त्याकडे दुर्लक्ष करतात याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT