TVK Government Tamil Nadu : तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने सत्तेवर झेंडा रोवला आहे.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांनी प्रशासनातही वेगाने बदल सुरू केले असून, त्याचा पहिला मोठा परिणाम आता पाहायला मिळत आहे.
राज्यातील पाच भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकाऱ्यांसह सहा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांची तिरुचिरापल्ली जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास सध्या तमिळनाडूच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
डिसेंबर 2016 बॅचचे IPS अधिकारी असलेले प्रवीण डोंगरे हे कर्तव्यदक्ष आणि कठोर अधिकारी म्हणून तमिळनाडूत (Tamil Nadu) ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तिरुवेरुंबूर येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून केली होती. सुरुवातीपासूनच त्यांनी दमदार कामगिरी करत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
यापूर्वी ते चेन्नईच्या पश्चिम विभागातील दक्षता आणि पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी विभागात कार्यरत होते. त्यांच्या कार्यशैलीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांची विशेष छाप निर्माण झाली होती. तमिळनाडूचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. मणिवसन यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात डोंगरे यांनी पूर्वी कनिष्ठ पदावर काम केले होते, त्याच जिल्ह्यात आता त्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या ‘विश्वासू अधिकाऱ्यां’मध्ये त्यांची गणना होऊ लागली आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांनी दोन मतदारसंघांतून उमेदवारी दाखल केली होती. चेन्नईतील पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील त्रिची पूर्व या दोन्ही मतदारसंघांत त्यांनी विजय मिळवला. मात्र, मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांनी त्रिची पूर्व मतदारसंघाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही जागा अधिकृतपणे रिक्त झाली असून, आता येथे पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे.
दरम्यान, त्रिची पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जर त्रिशा कृष्णन प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरल्या, तर ही पोटनिवडणूक तमिळनाडूतील सर्वात चर्चेची आणि हायप्रोफाइल लढत ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.