Girish Mahajn, Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजन तुम्ही हे काय केलं?, नाथाभाऊंचे काम सोपे केलं!

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणूक आता अधिक रंगतदार होईल.

Sampat Devgire

जळगाव : अखेर जळगाव जिल्हा बॅंकेच्या (Jalgaon District co-operative Bank) निवडणुकीचे मैदान अन् लढाई स्पष्ट झाली. खासदार रक्षा खडसे (M. P. Raksha Khadse) नाथाभाऊंच्या विरोधात लढतील. त्यांच्या विजयाची जबाबदारी नाथाभाऊंवर होती ती आता महाजनांवर (Girish Mahajan) आली. त्यामुळे महाजनांनी अप्रत्यक्षरित्या नाथाभाऊंचे काम सोपे करून राजकीय मदतच केली आहे. नाथाभाऊंचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यासाठी मनातून `गिरीशभाऊ धन्यवाद`

जळगाव जिल्हा बॅंकेची निवडणूक सुरु झाली आहे. अनेकांना ती एका सहकारी बॅंकेची निवडणूक वाटेल. प्रत्यक्ष ती भाजप नेते गिरीश महाजन यांचे जळगाव जिल्ह्यातील राजकारण पोखरणारी, त्यांची परिक्षा पाहणारी आहे. त्यात भाजपला पुर्ण बहुमत मिळवणे एक आव्हान आहे. तसे झाले नाही, तर ते एकतर कींग मेकर ठरतील किंवा बाजुला पडतील. किंग मेकर ठरले तर उत्तम, अन्यथा आगामी राजकारणात त्यांचे छुपे व उघड विरोधक त्यांचा एक एक गड काबीज करण्याच्या कामाला लागतील. ती त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरेल.

यावेळी दोन बॅंकांच्या निवडणुका सुरु आहेत. जळगाव व शेजारच्या धुळे-नंदूरबा. जळगावला प्रारंभी काँग्रेस व नंतर अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीने भाजप बरोबर न जाण्याचा निर्णय घेतला. वस्तुतः गिरीष महाजन यांची मानसिकता सुरवातीपासून सर्वपक्षीय पॅनेल व बिनविरोध निवडणूक हीच होती. त्याला धक्का बसला. शेजारी धुळे- नंदूरबारला सर्व पक्षीय पॅनेलची सूत्रे भाजप नेते अमरिशभाई पटेल व राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे आहे. तीथे राष्ट्रवादी गुण्यागोविदांने त्याचे समर्थन करत आहे. विरोध शिवसेनेचा आहे. जळगावलाच भाजप अस्पृष्य कशी?. याचे सोपे गणित म्हणजे महाविकास आघाडीचे मंत्री व नेत्यांवरील भाजप पुरस्कृत ईडी, सीबीआय, इकम टॅक्स या सर्व राजकीय छापेमारीत गिरीश महाजन आघाडीवर येऊन बोलतात. त्याचे हिरीरीने समर्थन करतात. त्यात त्यांना थोडासा गर्व देखील आहे. त्याचे उदाहरण म्हणजे, भाजपचे सरकार असताना साम, त्यातही दाम व दंड अधिकच, अनेक निवडणूक, संस्था त्यांनी सहज सर केल्या. अगदी मी बारामतीत सुद्धा चमत्कार करू शकतो, असे धाडस त्यांनी केले होते. नाथाभाऊंना जळगावच्या व राज्याच्या राजकारणात अडचणी वाढवण्यात त्यांचा उघड सहभाग होता. त्यामुळे नाथाभाऊंनाही मनातून ते नकोच होते. गिरीश महाजनांच्या गर्वाने त्यांना जिल्हा बँकेत एकटे पाडले.

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या. त्या भाजपच्या खासदार असल्याने ती त्यांची राजकीय सोय होती. मात्र जिल्हा बँकेत त्यांनी एकनाथ व रोहिणी खडसेंच्या विरोधात भूमिका घेतली ती राजकीय सोय नव्हे तर धोरण असावे. त्यात गिरीश महाजन यांनी त्यांना उमेदवारी करायला लावली. त्यामुळे त्यांच्या विजयाची जबाबदारी देखील महाजनांवरच आली. एरव्ही सहकाराची निवडणूक असल्याने एकनाथ खडसेंना त्यासाठी तोशीष, परिश्रम अन् मतदारांच्या `यात्रा`, `तीर्थ-प्रसाद` सर्व काही स्वतः पहावे लागले असते. ही जबाबदारी घेऊन गिरीश महाजनांनी नाथाभाऊंचे काम सोपे केले. म्हणून त्यांचे समर्थक त्यांना धन्यवाद देत असतील.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे, गिरीश महाजन, गुलाबराव देवकर, आमदार किशोर पाटील, मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यांच्यासह बहुतांश दिग्गजांच्या उमेदवारीवर हरकत घेण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा बँकेत सुनावणीसाठी मोठी गर्दी झाली होती. संचालकपदाच्या २१ जागांसाठी २७९ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाच्या हरकतींवर बुधवारी सुनावणी झाली. मात्र, हरकती मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे प्रत्येक उमेदवारांच्या हरकतीवर सायकाळपर्यंत सुनावणी सुरू होती. त्यामुळे या हरकतींवर आज देखील काम सुरु राहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी सांगितले. त्यामुळे ही निवडणूक आता अधिक रंगतदार होईल. मात्र खरी चर्चा होईल ती, एकनाथ खडसे आणि आमदार गिरीश महाजन यांचीच.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT