Ahmednagar Political News : नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीचा ज्वर चढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी दुसरा दिवस होता. निवडणुकीचे काहीसे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. गाव कारभाराच्या निवडणुकीपासून नेते जरी लांब राहत असले, तरी त्यांचे कार्यकर्ते भिडणार आहेत.
श्रीगोंदे तालुक्यातील राजकीयदृष्ट्या कोळगाव ग्रामपंचायतीची (Gram Panchayat) निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भिडणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे कोळगाव ग्रामपंचायतीची निवडणूक चर्चेत आली आहे. यातच तिसरी आघाडी होणार असल्याचीदेखील शक्यता आहे. मतदारांची दिवाळी जोरदार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे (BJP) आमदार बबनराव पाचपुते गटाचे पुरुषोत्तम लगड आणि माजी आमदार राहुल जगताप गटाचे हेमंत नलगे यांच्यात दुरंगी सामना होण्याची शक्यता आहे. यातच जिल्हा काँग्रेसचे (Congress) राजेंद्र नागवडे गटाचे अमित लगड यांनीदेखील तिसऱ्या आघाडीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे.
कोळगावची ग्रामपंचायत सुरुवातीपासून राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि संवेदनशील आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमध्ये निवडणुकीचा फड अधिक तापणार आहे. कोळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद लोकनियुक्त असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षित आहे.
सरपंच पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरपंच पदासाठीदेखील निवडणूक चुरशीची होणार आहे. सरपंचपद आपल्याच गटाकडे राहावे, यासाठी आजी-माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे.
गावातील राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खलबते सुरू केली आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी असलेले हॉटेल, ढाब्यांवर बैठका वाढल्याचे चित्र आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 पैकी हेमंत नलगे गटाने सरपंच पदासह आठ जण निवडून आले होते, तर पुरुषोत्तम लगड गटाचे 10 सदस्य निवडून आले. ग्रामपंचायतमध्ये सरपंच नलगे गटाचा झाला, तर बहुमत लगड गटाकडे असल्याने उपसरपंचपद लगड गटाकडे गेले.
सत्तेच्या पाच वर्षांत पाच जणांना उपसरपंच पदावर संधी देण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु हा अलिखित नियम पहिले तीन वर्षं चालू राहिला. यानंतर चौथ्या वर्षी उपसरपंच पदासाठी रस्सीखेच झाली. यात लगड गटात फूट पडली.
सारिका मोहारे या महिला सदस्याची नलगे गटाच्या साथीने उपसरपंचपदी खेचून आणले. या निवडीनंतर ग्रामपंचायतीवर हेमंत नलगे गटाची एक हाती सत्ता आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ग्रामपंचायत निवडणूक हेमंत नलगे आणि पुरुषोत्तम लगड या दोन्ही दिग्गजांसाठी अस्तित्व दाखवणारी ठरणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.