Ramgiri Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramgiri Maharaj : रामगिरी महाराजांचे विधान; 'ATS'कडून चौकशी करा

Pradeep Pendhare

Ahmednagar News : सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या विधानाचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), वैजापूर आणि अहमदनगरमध्ये पडसाद उमटले. अहमदनगर शहर आणि श्रीरामपूरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आले होते. मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढून रामगिरी महाराज यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली.

नगरमधील मुस्लिमांनी पोलिस अधीक्षकांमार्फत राज्य सरकारला निवेदन देत रामगिरी महाराज यांची दहशतवादी विरोधी पथकाकडून (ATS) चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावा, अशी मागणी केली.

सराला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), वैजापूर, अहमदनगर शहर आणि श्रीरामपूरमध्ये मुस्लिम समाज आज रस्त्यावर आला होता. यामुळे दिवसभर या भागात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी या परिस्थिती नियंत्रणासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या चारही शहरातून वाहतूक वळवली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. रामगिरी महाराज यांच्यावर काही ठिकाणी गुन्हे देखील झाले आहेत. रामगिरी महाराज यांच्याविरोधात मुस्लिम समाज आक्रमक झाला असताना, त्यांच्या सरला बेटावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सहभागी झाले होते.

अहमदनगर शहर आणि श्रीरामपूरमध्ये रामगिरी महाराज यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाने निषेध मोर्चा काढून अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन दिले. त्याचवेळी गुन्हा दाखल करण्याबरोबर रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानाची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, रामगिरी महाराज यांनी आपण आपल्या विधानावर ठाम आहोत, अशी भूमिका मांडली आहे. तसे वृत्त वृत्तवाहिन्यांमध्ये झळकतं होते.

रामगिरी महाराज जेव्हा विधान करत होते, त्यावेळी त्यांच्यासमोर एक चिठ्ठी दिसते. त्या चिठ्ठीत वाचून ते विधान करत असल्याचा संशय व्यक्त केला. ही चिठ्ठी असेल, तर ती कोणी लिहून दिली? तसंच रामगिरी महाराज यांनी पुढची काही विधानं केली आहेत, त्यात पाकिस्तानचा संदर्भ दिला आहे. या मागचे कारण काय? रामगिरी महाराज यांचा पाकिस्तानशी संबंध आहे का? त्यामुळे रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानामुळे त्यांची दहशतवादी विरोधी पथकाकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याची माहिती 'एमआयएम'चे (MIM) जिल्हाध्यक्ष परवेज अशरर्फी यांनी दिली.

रामगिरी महाराज यांनी हे विधान आताच करण्यामागे कोणती तरी शक्ती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. अशी विधान करून वातावरण दूषित केले जात आहे, हे स्पष्ट दिसते. पूर्वनियोजित हा प्रकार असून, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसंच या विधानांप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. यामुळे भविष्यात कोणी, कोणत्याही धर्माचा अनादर करणार नाही, अशी भावना मुस्लिम समाजाने व्यक्त केली. मुफ्ती सलमान अजहरी अजूनही अटकेत आहेत. रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध देखील तशीच कायदेशीर कारवाई होऊ शकते, याकडे देखील मुस्लिम समाजाने निवेदनातून लक्ष वेधले. अहमदनगरमधील मुस्लिम समाजाने निषेध मोर्चा काढत असतानाच त्याचवेळी श्रीरामपूरमध्ये मुस्लिमांनी मोर्चा काढून रामगिरी महाराज यांच्या विधानाचा निषेध केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT