Narhari Zirwal News
Narhari Zirwal News sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narhari Zirwal News: '...तर त्या १६ आमदारांना अपात्रच करेन!'; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच झिरवळांचं मोठं विधान

सरकारनामा ब्यूरो

Nashik : मागील वर्षी जून महिन्यात उध्दव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली होती.यानंतर या आमदारांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती.राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुढील काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी राज्यात घडणार असल्याचा दावाही नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे.

नरहरी झिरवळ(Narhari Zirwal) यांनी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणी आणि १६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य केलं आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वाचंच लक्ष लागलेलं असतानाच झिरवळ यांनी मोठं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जर माझ्याकडे त्या आमदारांचं प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाचं प्रकरण महत्त्वाचं आहे हे सर्वच म्हणतात. ते तेव्हाही महत्त्वाचं होतं, आणि आजही त्याचं महत्त्व तितकंच आहे. न्यायालयात विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असं होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असं म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे असा दावाही त्यांनी केला.

नरहरी झिरवळ यांना तुमच्याकडे आमदारांचं प्रकरण आल्यावर काय करणार? असा सवाल करण्यात आला. यावर माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकतं? कारण शेवटी कोर्ट आहे असंही मत झिरवळ यांनी व्यक्त केलं. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन असंही नरहरी झिरवळ म्हणाले.

स्वप्न पाहायला काय हरकत आहे...

यावेळी झिरवळ यांना तुम्ही मुख्यमंत्री(Chief Minister) व्हाल का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,केलं तर मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो. पण त्यासाठी संख्याबळ हवं ना. माझे कधीच होर्डिंग्ज लागणार नाहीत. लागले तर तुमचे आशीर्वाद पक्के असं समजायचं. स्वप्न पाहायला काहीच अडचण नाही अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. खुर्ची रिकामी नाहीये. पण सत्ता संघर्षावर लोकांचा तर्कवितर्क आहे. जर तरचा प्रश्न आहे. त्याला काही अर्थ नाही असंही झिरवळ यांनी सांगितलं.

..तेव्हाच दादा भाजपमध्ये जातील ना...

काही नेते भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही झिरवळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले,अजित(Ajit Pawar)दादा भाजपमध्ये जाणार असल्याची एक ते दीड महिन्यांपासून चर्चा आहे. आम्ही गेलो तर दादा जातील ना…पण आम्हालाच काही माहीत नाही. त्यामुळे अशा चर्चांना काहीच अर्थ नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या चर्चांचा आणि पवारांच्या राजीनाम्याचा काही संबंध नाही अशी भूमिकाही नरहरी झिरवळांनी स्पष्ट मांडली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT