Uday Samant
Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थी हितासाठी एकत्रित काम करावे

Sampat Devgire

जळगाव : विद्यापीठ (Education) स्वायत्त असल्यामुळे ते राज्य शासनाशी संपर्क ठेवत नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यांनी विद्यापीठ आणि राज्य शासन (State Government) यांनी संयुक्तपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे शैक्षणिक विकास वेगाने होईल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केले.

विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मेळावा झाला. यावेळी जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, प्रभारी कुलगुरू ई वायुवनंदन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्री महाजन, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी एकत्रित समन्वय ठेवण्याची गरज आहे. विद्यापीठाने जिल्हाधिकारी यांच्याशी कायम संपर्क ठेवला पाहिजे त्यामुळे अनेक अडचणी सुटतील व उपक्रम मार्गी लागतील.

विद्यापीठाने नोडल अधिकारी नेमावा

विद्यापीठाने राज्य शासनाशी समन्वय ठेवत काम करून घेण्यासाठी मंत्रालयात नोडल अधिकारी नियुक्त करावा, असे मत श्री. सामंत यांनी व्यक्त केले. यामुळे विद्यापीठाशी शासनाशी समन्वय राहील आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अद्यापही कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आलेली नाही, याबाबत बोलताना सामंत म्हणाले, याबाबतची प्रक्रिया आता सुरू झाली असून लवकरच कायम स्वरूपी कुलगुरूंची नियुक्ती करण्यात येईल.

२८८ प्राध्यापकांची नियुक्ती

विद्यापीठाअंतर्गत प्राध्यापक भरतीच्या प्रश्‍नाबाबत बोलताना सामंत म्हणाले, की २८८ प्राध्यापक भरतीचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार असून लवकरच ही भरती करण्यात येईल, तसेच एकदा प्राचार्य म्हणून नियुक्ती झालेला प्राध्यापक कायमस्वरूपी प्राचार्यच राहिल याबाबतचा नियम राज्य शासन लवकरच अमलात आणणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या अध्ययन केद्रांसाठी राज्यशासनाच्या माध्यमातून तीन कोटी रुपयाचा निधी देण्याची घोषणा मंत्री सामंत यांनी केली. त्यातील येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून विद्यार्थी उपक्रम करावेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

बहिणाबाईंच्या पुतळ्यासाठी एक कोटी

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाच्या आवारात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा आपण करीत आहोत. याशिवाय विद्यापीठ परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी गिरणा नदीच्या पुलावर बंधारा कम पूल बांधण्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी आपण चर्चा केली आहे, लवकरात लवकर त्याला निधी उपलब्ध होईल, असे मतही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT