Raver Panchayat Samiti Office Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रावेरला उघड झाला दीड कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’

स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत गैरव्यवहार; दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Sampat Devgire

रावेर : देशभरात विविध घोटाळे (Scams) उघडकीस येत असताना येथे ‘टॉयलेट घोटाळा’ (Toilet scam) उघडकीस आला आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत तालुक्यात (Raver) ऑगस्ट २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पंचायत समितीतील दोघा कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या नव्या घोटाळ्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लहान माशांबरोबर अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा टॅायलेट घोटाळा उघड करू असा इशारा दिला होता. मात्र सोमय्यांच्या आधीच रावेरचा घोटाळा उघड झाला आहे.

येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांना रावेर येथे हजर झाल्यापासून स्वच्छ भारत मिशन या योजनेच्या कॅनरा बँकेच्या येथील शाखेतील खात्यात आर्थिक व्यवहारांची अनियमितता दिसून आली. त्यामुळे त्यांनी हे खाते बंद करून अंतर्गत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीने आपला अहवाल २८ मार्चला त्यांच्याकडे सादर केला. या अहवालानुसार संबंधितांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजनेंतर्गत शौचालय बांधकामास देण्यात येणाऱ्या अनुदान रकमेत अफरातफर करून फौजदारी पात्र न्यायभंग केल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार येथील पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल चौधरी यांनी ही फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की ग्रामीण भागात शासनाने स्वच्छ भारत मिशन ही योजना अमलात आणली असून, या योजनेतून पंचायत समितीअंतर्गत तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधल्यावर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून १२ हजार रुपये प्रतिलाभार्थी दिले जाते. या योजनेचे काम समाधान निंभोरे (गटसमन्वयक) आणि मंजुश्री पवार (समूह समन्वयक) हे पाहतात. त्रिसदस्यीय चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार श्रीमती पवार यांनी प्रतिलाभार्थी १२ हजार रुपये प्रमाणे ३५ लाभार्थ्यांचे अनुदान इतर व्यक्तींच्या नावे वर्ग केलेले आहे, तसेच श्री. निंभोरे यांनी स्वतःच्या नावे, त्यांचे नातेवाईक आणि परिचित व्यक्तींच्या नावे तब्बल एक कोटी ६२ लाख ३६ हजार रुपये इतकी रक्कम वर्ग करून गैरव्यवहार केला आहे. श्रीमती पवार व श्री. निंभोरे यांनी मिळून एक कोटी ६६ लाख ५६ हजार रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यातील १३ लाख ९२ हजार रुपये इतकी रक्कम काही कारणास्तव स्वच्छ भारत मिशनच्या खात्यावर परत आली असून, एक कोटी ५२ लाख ६४ हजार रुपये इतक्या रकमेचा लाभार्थ्यांना लाभ न देता खोटी व बनावट यादी तयार केली.

या यादीवर गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी न घेता ‘करिता’ म्हणून स्वतःची व इतर व्यक्तींची बनावट स्वाक्षरी करून यादी बँकेला दिली व याद्वारे संबंधित व्यक्तींशी हातमिळवणी करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलेला आहे. त्रिसदस्यीय चौकशी अहवालाचे अवलोकन केले असता, काही ठराविक खाते क्रमांकावर रक्कम वारंवार वर्ग करण्यात आली आहे. संबंधितांनी संबंधित व्यक्तीच्या खाते क्रमांकावर नाव, गाव वारंवार बदलून रक्कम टाकली आहे. बँकेने देखील गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची पडताळणी न करता इतरांच्या स्वाक्षरीने आलेल्या यादीनुसार रक्कम वर्ग केल्याची गंभीर बाब उघडकीला आली आहे.

काही याद्यांमध्ये नावे आणि बँक खाते क्रमांक जुळत नसताना देखील बँकेने गटविकास अधिकारी यांच्या चेकवरील सही, तसेच दिलेल्या यादीवरील सही याची खात्री न करता तसेच नाव व खाते क्रमांक जुळत नसतानाही त्यावर रक्कम वर्ग केली आहे. यावरून संबंधित बँकेचे कामकाज देखील संशयास्पद वाटत असल्याचे अहवालात म्हटले आहे. निंभोरे यांनी स्वतःच्या तीन बँकेच्या खाते क्रमांकावर ३३ वेळा एकूण ६ लाख १४ हजार ४४७ रुपये रक्कम वर्ग केलेले दिसून येते. या अहवालावरून सोमवारी (ता. १८) रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचा तपास सुरू

पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कागदपत्रांची छाननी आणि पुराव्यांची पडताळणी करण्यात येत आहे, अशी माहिती तपास अधिकारी शीतलकुमार नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. पडताळणी पूर्ण होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कारवाईला सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT