Jalgaon moneylender news: आर्थिक अडचणीचा गैरफायदा घेऊन जळगाव येथील सावकाराने ३० लाख रुपये कर्ज दिले. त्यासाठी त्याने चक्क तीन कोटींची जमीन आपल्या नावावर करून घेतली. सहकार उपनिबंधकांच्या छाप्यात ही धक्कादायक माहिती स्पष्ट झाली.
जळगाव येथील राजकुमार नारायण पाटील यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी मनोज लीलाधर वाणी आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून तीस लाख रुपये कर्ज घेतले होते. त्यासाठी वाणी यांनी तीन कोटींची जमीन आपल्या नावे खरेदी करून घेतली. व्याजाने पैसे देण्याचा हा व्यवहार २०२१ मध्ये झाला होता.
सावकार श्री. वाणी यांनी पाटील यांना २६ लाख रुपयांचा धनादेश आणि चार लाख रुपये रोख दिले. त्या बदल्यात संबंधीत जमीनीची श्री. वाणी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे खरेदी खत करून घेण्यात आले. या संदर्भात रवींद्र कोळी महेंद्र सोनवणे सुभान रहमतुल्ला खाटीक, बापू पाटील आणि विनोद देशमुख हे साक्षीदार होते. याबाबत पोलिसांत अद्याप तक्रार नाही.
राजकुमार पाटील यांनी वाणी यांचे ३० लाख रुपये व्याजासह परत केले. ठरल्याप्रमाणे पैशांची परतफेड केल्याने जमीन पाटील यांच्या नावावर करणे आवश्यक होते. पाटील यांनी जमीन परत मिळावी यासाठी पाठपुरावा केला. मात्र वाणी यांनी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले.
या संदर्भात जिल्हा सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे पाटील यांनी अवैध सावकारीची तक्रार केली. सहकार विभागाने याबाबत चौकशी करून वाणी यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. वाणी यांच्या घरातून नऊ खरेदीखत आणि तीन सौदा पावत्या जप्त करण्यात आले आहेत.
यापूर्वी नाशिकला सावकारीतून अपहरण जीवे मारण्याचा प्रयत्न आणि आत्महत्या असे गंभीर प्रकार घडले होते. आता हे लोन जळगाव मध्येही पसरले आहे. अवैध आणि वैध सावकारीचा माध्यमातून लूट आणि फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत.
तीन कोटीची जमीन अवघ्या ३० लाखात लुबाडण्याचा प्रकार जळगावत घडल्याने खळबळ उडाली आहे. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध सावकारी च्या प्रकरणांची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात पुढील कारवाई सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.