Nashik News, 01 Sep : नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नियोजनाला वेग आला आहे. मात्र, या नियोजना दरम्यानच प्रशासनाला मोठ्या गर्दीचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त झालेल्या श्रावण फेरीत चार लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली. या प्रचंड गर्दीमुळे काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः गर्दीत अडकले.
मात्र, त्यांच्या अंगरक्षक आणि पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्याने ते थोडक्यात बचावले. त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी श्रावण फेरीची परंपरा आहे. या फेरीला दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी होते. यंदा मात्र या गर्दीने उच्चांक गाठला. चार लाखांहून अधिक भाविक फेरीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. श्रावण फेरीचा समारोप कुशावर्त तीर्थावर स्नान करून करण्याचा अनेक भाविकांचा संकल्प असतो. त्यामुळे कुशावर्त परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
सध्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध विभागांचे नवीन अधिकारी आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनात व्यस्त आहेत. कुंभमेळ्याच्या काळात होणाऱ्या संभाव्य गर्दीचा अनुभव घेण्यासाठी बहुतांश अधिकारी सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे देखील कुशावर्त परिसरात पोहोचले होते.
कुशावर्त परिसरातील अरुंद जागेत एकाच वेळी हजारो भाविक दाखल झाल्याने अचानक गर्दीचा मोठा दबाव निर्माण झाला. परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी स्वतः गर्दी नियंत्रणात मदत करू लागले. मात्र, काही वेळातच ते प्रचंड गर्दीत अडकले. गर्दी इतकी वाढली की त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर पडणेही कठीण झाले.
परिस्थितीची कल्पना येताच जिल्हाधिकाऱ्यांचे अंगरक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गर्दीतून बाजूला काढून एका चौथऱ्यावर सुरक्षितपणे उभे केले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही या प्रचंड गर्दीचा अनुभव घेतला. गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली.
पोलिसांनी गर्दीचा ओघ नियंत्रित करत कुशावर्त परिसरात येणाऱ्या भाविकांना रोखले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. वेळीच पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीमुळे चेंगराचेंगरीची मोठी घटना टळली. मात्र, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती प्रशासनासाठी महत्त्वाचा धडा ठरली आहे. नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.