Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukai Irrigation Scheme : लोकार्पणाचा गाजावाजा, पण वितरण कुंड कोरडाच? राम शिंदेंच्या तुकाई योजनेवर शरद पवार राष्ट्रवादीचा हल्लाबोल!

Tukai irrigation scheme in Karjat sparks controversy as NCPSP leader alleges incomplete work and no water in the distribution tank during inauguration : 21 गावांच्या सिंचन योजनेचे काम 70 ते 75 टक्केच पूर्ण असल्याचा दावा; पाणी पोहोचण्याआधीच लोकार्पणाची घाई का? असा सवाल

Pradeep Pendhare

Karjat Irrigation Project : अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील 21 गावांना लाभ देणाऱ्या तुकाई उपसा सिंचन योजनेच्या लोकार्पण सोहळ्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत या योजनेचा लोकार्पण सोहळा पार पाडला. मात्र, कार्यक्रमाच्या वेळी वालवड येथील वितरण कुंडात पाणी पोहोचले नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रघुआबा काळदाते यांनी केला आहे.

योजनेचे काम पूर्ण होण्यापूर्वीच लोकार्पणाची घाई का करण्यात आली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काळदाते यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर कार्यक्रमाचे विविध फोटो प्रसिद्ध करण्यात आले; मात्र वितरण कुंडात पाणी पोहोचल्याचा फोटो का प्रसिद्ध केला नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तुकाई उपसा सिंचन योजनेतून कर्जत तालुक्यातील 21 गावांना लाभ मिळणार असून, या योजनेद्वारे 27 लहान-मोठे तलाव भरले जाणार आहेत. 7 मार्च 2019 रोजी तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता.

या योजनेसाठी सुरुवातीला 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. त्यानंतर निधी वाढवून 68 कोटी रुपये करण्यात आला. (NCPSP) आमदार रोहित पवार यांनीही योजनेचा पाठपुरावा करून आवश्यक मंजुरी मिळवली, काही गावांचा समावेश केला आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात अतिरिक्त निधी मिळवून दिला, असे काळदाते यांनी सांगितले. मात्र, योजनेचे काम अद्याप पूर्ण झाले नसून काही गावांमध्ये वितरण नलिका टाकण्याचे काम बाकी असल्याचा दावा त्यांनी केला. योजनेचे सुमारे 70 ते 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वितरण कुंडात पाणीच नाही...

सोमवारी वालवड येथे योजनेच्या वितरण कुंडाजवळ मोठा शामियाना उभारून चाचणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, पंप हाऊसपासून जलकुंभापर्यंत पाणी पोहोचले नसल्याने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लाभार्थी ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाल्याचा आरोप काळदाते यांनी केला. योजनेच्या वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण होण्यापूर्वी आणि शासनस्तरावरील चाचण्या पार पडण्याआधीच लोकार्पण सोहळा आयोजित करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पालकमंत्री विखेंची कार्यक्रमाला अनुपस्थित

या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनुपस्थित राहिल्याचा मुद्दाही काळदाते यांनी उपस्थित केला. योजनेच्या कामकाजाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर विखे पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित न राहणे उचित समजले असावे, असा दावा त्यांनी केला.

एमआयडीसीचा मुद्दा उकरून काढला

आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारी एमआयडीसी मंजूर करून आणली; मात्र राजकीय श्रेयवादातून त्यात अडथळे आणण्यात आले, असा आरोप काळदाते यांनी केला. कर्जत आगाराचे काम पूर्ण होऊन बस उपलब्ध झाल्यानंतरही अडथळे आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

लोकार्पणाची घाई का?

तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम अपूर्ण असताना पाणी पूजन आणि लोकार्पण करण्याची घाई करणे हे विधान परिषदेच्या सभापती पदाला न शोभणारे असल्याची टीका काळदाते यांनी केली. 'अपूर्ण कामांचे उद्घाटन आणि श्रेयवाद करण्यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचविण्यासाठी पदाला शोभेल असे काम करावे,' असे आवाहनही त्यांनी केले.

ठेकेदाराच्या संथ कामाचा मुद्दा

तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम संबंधित ठेकेदाराने अत्यंत संथगतीने केल्याचा आरोप काळदाते यांनी केला. या साडेसात वर्षांच्या कालावधीत दोन विधानसभा निवडणुका पार पडल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये प्रा. राम शिंदे यांना आमदार रोहित पवार यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांनी नमूद केले. ही योजना आपणच मार्गी लावणार, असा निर्धार राम शिंदे यांनी केला असला, तरी लोकार्पण सोहळ्याच्या वेळी वितरण कुंडात पाणी आणता आले नाही, ही शोकांतिका असल्याची टीका काळदाते यांनी केली.

2029च्या निवडणुकीची चाचणी?

तुकाई उपसा सिंचन योजनेच्या चाचणीचा हा कार्यक्रम होता की 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची चाचणी, असा उपरोधिक सवाल काळदाते यांनी उपस्थित केला. योजनेचे लोकार्पण झाल्यानंतर प्रत्यक्ष लाभार्थी गावांमध्ये पाणी पोहोचते का, याकडे आता कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT