

Mumbai cash video controversy : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांनी भरलेल्या बॉक्सचा एक व्हिडीओ समोर आणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण केली आहे. हा व्हिडिओ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कुलाबा येथील शाखाप्रमुख संतोष पवार यांचा असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे.
या व्हिडिओमध्ये सुमारे 50 लाख रुपये असलेला नोटांचा बॉक्स वरिष्ठ नेत्याकडून मिळाल्याचे पवार सांगत असल्याचा दावा मनसेने केला आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, संतोष पवार अद्याप समोर आले नसल्याचे सांगत संदीप देशपांडे यांनी त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
संतोष पवार कालच्या पत्रकार परिषदेनंतर समोर आलेले नाहीत, असा दावा मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला. यावर बोलताना ते म्हणाले, "कालच्या पत्रकार परिषदेपासून संतोष पवार गायब आहेत. त्यांचे अपहरण तर झालेले नाही ना? त्यांच्या जीवाला धोका तर नाही ना? पोलिसांनी त्यांना तत्काळ शोधले पाहिजे. त्यांना संरक्षण दिले पाहिजे." या व्हिडिओसंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे संतोष पवार यांनीच द्यावीत, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. संबंधित व्हिडिओतील पैशांचा स्रोत काय, ते पैसे कोणी दिले आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे (Police) तक्रार दाखल केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसेच निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. हा विषय निवडणुकीशी संबंधित असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मनसेची भूमिका आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांकडे तक्रार करावी आणि एफआयआर दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही देशपांडे यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ आठ महिन्यांपूर्वीचा असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांकडून मांडली जात आहे. मात्र, व्हिडिओ जुना असल्याचे कारण देऊन प्रकरणाची चौकशी टाळता येणार नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, "आठ महिन्यांपूर्वीचा विषय जरी असला, तरी तो निवडणुकीशी संबंधित आहे. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे. आठ महिन्यांपूर्वी एखादा खून झाला आणि तो त्यानंतर उघडकीस आला, तर त्याची चौकशी होतेच ना? प्रकरण जुने झाले म्हणून ते सोडून देता येत नाही." व्हिडीओ किती जुना आहे, यापेक्षा त्यामध्ये दाखवण्यात आलेला प्रकार घडला होता की नाही, हे तपासणे महत्त्वाचे आहे, असेही देशपांडे यांनी म्हटले.
संदीप देशपांडे यांनी समोर आणलेल्या व्हिडिओचा संबंध मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 226 मधील निवडणुकीशी असल्याचा दावा केला आहे. संतोष पवार हे या प्रभागातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या व्हिडिओमुळे संबंधित प्रभागातील निवडणुकीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या प्रभागात महायुतीकडून भाजपचे उमेदवार मकरंद नार्वेकर यांनी निवडणूक लढवली होती. ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आहेत. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांची युती होती.
या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणे, काही अर्ज बाद होणे आणि मनसेच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे अशा घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक 226 चर्चेत आला होता. आता पैशांनी भरलेल्या बॉक्सचा कथित व्हिडिओ आणि त्याचा निवडणुकीशी जोडला जाणारा संदर्भ यामुळे या प्रभागातील राजकीय वाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मनसेने या प्रकरणाची पोलिस आणि निवडणूक आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, व्हिडिओतील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी होणे आणि संबंधित संतोष पवार यांची बाजू समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस आणि निवडणूक आयोग काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.