Ahmednagar Police  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar : नगर शहरात वातावरण तापलं; व्यापाऱ्यांवरील हल्ला प्रकरणात दोघांना अटक

Ahmednagar city : या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं.

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याप्रकरणी जखमी व्यापारी नवलानी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपींविरूद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी अमर हमीद शेख व रिजवान अमीर सय्यद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

नगर शहरातील व्यापाऱ्यांवरील जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात आलं आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

खासदार विखे यांनी व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी बोलताना विखे म्हणाले, ''काल (शुक्रवारी) ज्या पद्धतीने समाज कंटकांनी प्राणघातक हल्ला केला. आता हे सर्व सहनशिलतेच्या पलिकडे गेलं आहे. पण मी तुम्हाला विश्वास देतो की, ज्या पद्धतीने कारवाई पुढच्या दहा दिवसांमध्ये होणार आहे. ही कारवाई कुणीही आलं तरी थांबणार नाही. कुणाच्याही सांगण्याने ही कारवाई थांबणार नाही. मी खासदार आहे त्यामुळे माझी ही जबाबदारी आहे'', असं ते म्हणाले.

''गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार पोलीस प्रशासनाने जर पुढील दहा दिवसांमध्ये कुठलीही दिरंगाई केली तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल. यावर आता परमनंट उपाय काढला जाईल. सर्व व्यापाऱ्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी आमची आहे. पोलीस प्रशासन कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. या प्रकरणामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप स्वीकारणार नाही'', असं आश्वासन विखे त्यांनी व्यापाऱ्यांना दिलं.

नेमकं घटना काय?

नगर शहरातील कापड बाजारामध्ये शुक्रवारी सायंकाळी दीपक नवलानी या व्यापाऱ्यांशी काही जणांनी हुज्जत घालत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये नवलानी गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. तर या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं. तसेच या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT