जळगाव : जळगाव (jalgaon) जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ झाला. लोकसहकार गटाच्या फुटीर संचालकांना मतदानापासून रोखण्यासाठी हाणामारीपर्यंत मजल गेली. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीने संचालकांना सभास्थळी पोचविण्यात आले. अध्यक्षपदाच्या निवडीत सहकार गटाने बाजी मारली असून उदय पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. सहकार गटाला साथ देणारे लोकसहकार गटाचे रवींद्र सोनवणे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत. (Uday Patil President & Ravindra Sonawane Vice President of Jalgaon Government Servant Society)
जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज (ता. १२ मे) संस्थेच्या बळीराम पेठ येथील सभागृहात झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी काम पाहिले. संचालकांच्या निवडणुकीत कोणत्याही गटाला बहुमत मिळाले नव्हते. सहकार गटाचे ९, लोकसहकार गटाचे ६, तर प्रगती गटाचे ६ सदस्य निवडून आल्याने त्रिशंकू स्थिती होती. मात्र, लोकसहकार गटाचे रवींद्र सोनवणे व ज्ञानेश्वर सोनवणे हे दोन सदस्य फुटले आणि सहकार गटाला जाऊन मिळाले, त्यामुळे सहकार गटाची संख्या ११ झाली होती. लोकसहकार व प्रगती गटाची युती होऊनही त्यांनी सदस्यसंख्या दहाच राहिली.
सभेपूर्वी हाणामारी
लोकसहकार गटाचे फुटीर तसेच सहकार गटाचे संचालक सभास्थळी येत असताना संस्थेच्या कार्यालयाजवळ फुटीर गटाच्या संचालकांना सभेत जाण्यापासून लोकसहकार गटाच्या काही जणांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन गटात हाणामारी झाली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. परंतु पोलिसांनी मध्यस्थी करून संचालकांना सभास्थळी सुरक्षितपणे पोचविले.
सहकार गटाची बाजी
निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी सहकार गटाकडून उदय पाटील, तर लोकसहकार आणि प्रगती गटाच्या युतीतर्फे रावसाहेब मांगो पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उपाध्यक्ष पदासाठी सहकार गटातर्फे लोकसहकार गटाचे फुटीर रवींद्र मुकंदा सोनवणे यांनी, तर युतीतर्फे लोकसहकार गटाचे अनिल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला. यात अध्यक्षपदी सहकार गटाचे उदय पाटील, तर उपाध्यक्षपदी सहकार गटाच्या पाठींब्याने लोकसहकार गटाचे फुटीर रवींद्र सोनवणे विजयी झाले, त्यांना प्रत्येक ११ मते मिळाली, तर विरोधी उमेदवारांना दहा मते मिळाली.
जल्लोष न करता निषेध
सहकार गटाने अध्यक्षपदात बाजी मारली असली तरी त्यांनी कोणताही जल्लोष केल नाही. सदस्यांना विरोधकांतर्फे करण्यात आलेल्या मारहाणीचा त्यांनी निषेध केला. गटनेते व अध्यक्ष उदय पाटील यांनी गटाच्या सर्व संचालकासह पोलिस स्टेशनला जावून तक्रार दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.