Shivsena UBT News : भाजपच्या नेत्या आणि महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती संगीता गायकवाड यांनी आज शिवबंधन बांधले. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रवेश केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का आहे.
भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी हंड्रेड प्लसची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गळतीला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने भाजपला पहिला धक्का दिला.
भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मातोश्रीवर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलाच चिमटा घेतला. आज नरक चतुर्दशी अर्थात नरकासुराचा वध करण्याचा दिवस आहे. आगामी निवडणुकीत महाराष्ट्रावरील भाजपचे नरकासुराचे संकट आपल्याला नेस्तनाबूत करायचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईल'या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले मी देखील नाशिकला पुन्हा येईल. मी पुन्हा येईल मात्र नाशिकवर भगवा फडकवूनच जाईन. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना घोषणा देत प्रतिसाद दिला. जिल्हाप्रमुख डीजे सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांनी या प्रवेश कार्यक्रमाचे संयोजन केले.
महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती संगीता गायकवाड, भाजपचे नाशिक रोड मंडल माजी अध्यक्ष हेमंत गायकवाड, प्रा. डॉ लक्ष्मण शेडगे, शिवांश फाउंडेशनच्या किमयाताई बागुल, मराठा महासंघाच्या कार्याध्यक्ष रोहिणी उखाडे, प्रवीण पाटील, भाजपचे सातपूर पदाधिकारी अंकुश व्हावल, एकनाथ शिंदे युवा सेनेचे सत्यम खोले, हर्ष चव्हाणके आदींनी यावेळी पक्षप्रमुख ठाकरे आणि खासदार राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.