Aditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackeray : ‘मला कोणालाही चोरून भेटण्याची गरज नाही’

Sampat Devgire

Aditya Thackeray News : आम्ही स्वच्छ राजकारण करतो, त्यामुळे कोणाशीही छुप्या भेटीची गरज नाही. मातोश्रीवर कोणाला दरवाजे उघडे, कोणाला बंद हे उद्धव ठाकरे ठरवतील, असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray will take decision on Rebel MLA)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर होते. यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि ठाकरे यांची एका रिसॉर्टमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

ठाकरे यांनी अत्यंत टोकदार भाषेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, रोज नवे दावे करणारे राज्यातील सरकार एकही निवडणूक घेऊ शकत नाही. लोकशाही मार्गावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक त्यांनी मध्यरात्री थांबवली. यावरून त्यांच्यात किती व काय हिंमत आहे हे सगळे स्पष्ट होते. हे गद्दारांचे आणि अत्यंत डरपोक मुख्यमंत्री आहेत, जे एक सिनेटची निवडणूक करू देत नाहीत, अशा लोकांना लोकशाहीवर बोलायचा अधिकार तरी राहतो का?, असा प्रश्न केला.

लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार आहोत. त्याबाबत कोणीही शंका घेऊ नये. आमचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. सर्व मतदार देखील निवडणुकांना घाबरणाऱ्या या सरकारच्या पराभवाच्या संधीची वाट पहात आहेत. सध्याची स्थिती पाहिली तर राज्यात लोकशाही आहे की नाही हा विषय अधिक महत्वाचा आहे, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी राज्यातील सरकार जनतेच्या प्रश्नावर उदासीन आहे, असे सांगितले. ते म्हणाले, आज कोणीही मंत्री जनतेच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. सर्व मंत्री पालकमंत्री होण्यासाठी धडपडत आहेत. कोणीही आंदोलन करू लागले, की हे सरकार घाबरते. लगेच त्यांच्यावर धाडी पडायला लागतात. उद्या तुमच्यावर देखील धाडी पडतील, सांगता येत नाही. जे कोणी सत्यमेव जयते यावर विश्वास ठेऊन काम करतील त्यांना आत टाकले जाईल, अशी राज्यातील स्थिती झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT