Balasaheb Thorat, Uddhav Thackeray & Sharad Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackrey Politics: शिवसेना ठाकरे पक्ष म्हणतो, ‘नाशिकमध्ये मीच मोठा भाऊ’

Sampat Devgire

Mahavikas Aghadi News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या संभाव्य जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपावरून वाद अटळ आहे.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी प्रदेश समितीकडे विविध मतदार संघाची मागणी नोंदविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि गजानन शेलार यांनी जिल्ह्यातील आठ जागांवर धावा केला आहे.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार निवडून आले होते. यंदा पक्षाने नाशिक शहरातील भाजपचे आमदार असलेल्या दोन जागांवर देखील दावा केला आहे. या पक्षाकडे अनेकांनी उमेदावारी मागितली आहे.

यातील काही मतदारसंघांत शिवसेना ठाकरे गटाने देखील उमेदवारी जाहीर केली आहे. या वादात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहे. त्यात काँग्रेसची कोंडी होऊ शकते.

सध्या काँग्रेस पक्षाने इगतपुरी, येवला, नाशिक मध्य, सिन्नर, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य, बागलाण आणि चांदवड या मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे इगतपुरी मतदारसंघात हिरामण खोसकर हे एकमेव आमदार विजयी झाले होते.

काँग्रेस पक्षाने बागलाण, चांदवड, नाशिक मध्य, मालेगाव बाह्य, आणि मालेगाव शहर या मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते. यंदा काँग्रेस पक्षाने येवला या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या मतदार संघाची अतिरिक्त मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ (येवला), दिलीप बनकर (निफाड), माणिकराव कोकाटे (सिन्नर), नरहरी शिरवळ (दिंडोरी), नितीन पवार (कळवण), सरोज अहिरे (देवळाली) हे सहा विद्यमान आमदार आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ (नांदगाव), दीपिका चव्हाण (बागलाण) आणि अद्वय हिरे (नाशिक पश्चिम) हे तीन उमेदवार पराभूत झाले होते.

या सर्व नऊ जागांवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि शहर अध्यक्ष गजानन शेलार यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. सध्या जिल्ह्यात 55 इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक इच्छुक देवळाली विधानसभा मतदारसंघात आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांची 2019 च्या निवडणुकीत युती होती. यामध्ये जिल्ह्यातील 15 पैकी सहा जागांवर भाजपने उमेदवार दिले होते. यामध्ये डॉ राहुल आहेर (चांदवड), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), राहुल ढिकले (नाशिक पूर्व), सीमा हिरे (नाशिक पश्चिम) आणि दिलीप बोरसे (बागलाण) हे पाच आमदार विजयी झाले होते. कळवण मतदार संघात भाजपचा पराभव झाला होता.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा येवला, इगतपुरी, सिन्नर, निफाड, देवळाली, दिंडोरी, या सहा जागांवर पराभव झाला होता. दादा भुसे (मालेगाव बाह्य) आणि सुहास कांदे (नांदगाव) हे दोन उमेदवार विजयी झाले होते.

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. यामध्ये नाशिक आणि दिंडोरी तसेच उर्वरित तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश होणाऱ्या धुळे या तिन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT