_Adway Hiray, Uddhav Thackeray & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरे गरजले, मालेगावला लागलेला दादा भुसेंच्या गद्दारीचा कलंक पुसून टाका!

Uddhav Thackrey; Thackrey appeal Defeat Dada Bhuse in Malegaon-मालेगावच्या मतदारांएैवजी स्वतःच्या मुलाबाळांची भरभराट करून मतदार संघाला भकास करणाऱ्या दादा भुसेना पाडा

Sampat Devgire

Assembly election 2024: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मालेगाव येथे मंत्री दादा भुसे यांची अक्षरशा चिरफाड केली. जे खाल्ल्या मिठाला जागला नाही. खाल्लेल्या अन्नाची शपथ घेऊन गद्दार झाला, तो मतदार संघाचा काय होणार? अशी टीका ठाकरे यांनी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगाव येथे पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी ठाकरे यांनी महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मालेगावचे मंत्री दादा भुसे यांच्यावर तोफ डागली. मंत्री भुसे यांचा भुसा पाडायलाच मी मालेगावला आलो आहे. या गद्दाराला यंदा विधानसभेत पोहोचू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ठाकरे यांनी अद्वय हिरे यांच्या लढाऊपणाचे कौतुक केले. दादा भुसे यांनी खोट्या केसेसे करून विरोधकांना त्रास दिला. सगळीकडे खोट्या केसेस आणि प्रशासनाचा वापर करून शिवसेनेच्या निष्ठावंतांना त्रास देण्याचे काम गद्दार करीत आहेत. मालेगावमध्ये गद्दार भुसे यांनी अद्वय हिरे यांना एक वर्ष जेलमध्ये टाकले. तेजेलमध्ये गेले मात्र घाबरले नाही. निष्ठा सोडली नाही. माझा मालेगावचा आमदार यंदा अद्वय हिरेच असेल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, गेली अडीच वर्ष महाराष्ट्रात एका उद्योगपतीसाठी सरकार काम करत होते. सरकार पाडण्याच्या मिटींगला सुद्धा हा उद्योगपती अदानी उपस्थित होता. आता महाराष्ट्रात सरकार कोणाचे आणि सत्तेत कोण येणार हे सुद्धा अदानी ठरवणार आहे का? मग या मतदारांना आणि जनतेला काहीच किंमत नाही का? असा प्रश्न भाजप आणि मिंध्यांना विचारला पाहिजे.

या गद्दारीचा धडा त्यांना शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मुंबईतली जवळपास एक हजार एकर जमीन भाजपच्या सरकारने अदानीला दिली आहे. त्याच्या घशात हात घालून ही जमीन पुन्हा मुंबईला देणार. असा इशारा ठाकरे यांनी दिला.

कोरोनाच्या काळात सुद्धा मुख्यमंत्री म्हणून मी उत्तम काम करून दाखवले. साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक मी महाराष्ट्रात आणली होती. सध्याचे सरकार मात्र महाराष्ट्राच्या वाट्याचे सर्व काही गुजरातला देण्यात धन्यता मानत आहे. अनेक प्रकल्प गुजरातला देत आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला देणारे हात मी छाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

यावेळी ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावरही टीका केली. ते म्हणाले, या गद्दारांचा न्याय सर्वोच्च न्यायालयात होईल, असे मला वाटत होते. मात्र अडीच वर्षे झाली काहीही निकाल हे न्यायालय देऊ शकले नाही. देशाच्या न्याय हक्कासाठी एवढा विलंब होत आहे. मग लोकशाहीचे काय होणार? असा प्रश्न त्यांनी केला. न्यायाधीश केवळ आदर्शाच्या गप्पा मारत होते. विधाने करत होते. मग त्यांनी निर्णय का दिला नाही, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला.

मंत्री दादा भुसे यांना ठाकरे यांनी पराभूत करण्याचे आवाहन मतदारांना केले. ते म्हणाले, त्या भुसेचा भुसा पाडायलाच मी आलो आहे. त्याच्याशी माझा काहीच संबंध उरलेला नाही. माझे ठाकरेंची संबंध आहे, असे सांगण्याचा प्रयत्न तो करतो. माझा दृष्टीने तो आता फक्त गद्दार आहे. त्याच्याशी काडीचाही संबंध नाही. ज्याला मी मोठे केले. सर्व काही दिले. तोच गद्दार निघाला. कामाचा पत्ता नाही. त्याने मतदारसंघातील सर्व कामे एकाच कंपनीला देऊन घरातल्या मुलाबाळांचा फायदा करून घेतला. रस्ते खोदून ठेवले. आता त्या खोदलेल्या रस्त्यात दादा भुसेला गाडा आणि वरून माती टाका. हा भुसे खाल्लेल्या अन्नाची शपथ घेऊन गद्दारी करतो. तो मतदारांचा आणि मतदारसंघाशी काय करेल? याचा विचार करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांनी थेट आव्हान दिले. ते म्हणाले, यांचे सरकार आता फक्त दहा दिवसांचे राहिले आहे. त्यांनी आमचा पक्ष चिन्ह आणि अगदी माझा बाप देखील चोरला. यांच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचा फोटो लावून मते मागून दाखवा. तुमच्या वडीलांचे कर्तुत्व तरी काय हेही एकदा जनतेला कळेल, असे ठाकरे यांनी सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT