Unmesh Patil & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unmesh Patil Politics: नार-पार गिरणा प्रश्नावर खानदेशच्या रिक्षा चालकांचे कल्याणमध्ये आंदोलन!

Unmesh Patil Politics, Why did BJP oppose Nar-par?, Our agitation is for future of Khandesh-उगम ते संगम अशी नार-पार गिरणा प्रकल्पांच्या गावात होणार आंदोलनाची बांधणी

Sampat Devgire

Unmesh Patil Vs BJP: नारपार गिरणा प्रकल्पाच्या मंजुरीसाठी माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. यासाठी आंदोलक रात्रभर पाण्यात उभे होते. त्यामुळे राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागली.

नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्रातील भाजप सरकारचे मंत्री आर. सी. पाटील यांनी नकार दिला. हा नकार आता भाजपच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. भाजपची सत्ता असलेल्या जळगाव जिल्ह्यात या प्रश्नावर राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.

या संदर्भात पुर्वाश्रमीचे भाजप नेते माजी खासदार उमेश पाटील यांनी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे. त्यांना भाजप विरोधात आयताच मुद्दा मिळाला. या प्रश्नावर जोरदार आंदोलन उभे करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात तीस तास आंदोलक तापीच्या पाण्यात उभे होते.

जिल्हा प्रशासन या आंदोलनाने हादरले. मात्र आंदोलकांनी जिल्हा प्रशासनाला दाद दिली नाही. त्यामुळे जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना त्यात हस्तक्षेप करावा लागला.

माजी खासदार पाटील हे भाजप नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक आहेत. या राजकीय संदर्भामुळे गुलाबराव पाटील यांचा हस्तक्षेप ग्रामविकास मंत्री महाजन यांना पसंत पडला नसावा.

नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पाबाबत केंद्राने प्रस्ताव नाकारला. त्यावर तातडीचा उपाय म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडून मिळालेले पत्र व्हायरल केले.

त्यावर माजी खासदार पाटील म्हणाले, सात वर्षांपूर्वी देखील राज्यपालांचे असेच एक पत्र आले होते. मात्र त्यावर काहीही कृती झालेली नाही. एक रुपयाची देखील आर्थिक तरतूद झालेली नाही. भारतीय जनता पक्षाने नारपार गिरणा प्रकल्पाला मंजुरी दिली असती, तर आमच्यावर आंदोलन करण्याची वेळच आली नसती.

विशेष म्हणजे माजी खासदार पाटील यांनी या आंदोलनाची चांगली बांधणी केली आहे. त्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि यांसह पाण्यावर काम करणाऱ्या विविध संस्था एकत्र आल्या आहेत.

विशेष म्हणजे कल्याण शहरात अनेक खानदेशी बांधव रिक्षा व्यवसाय करतात. या रिक्षा चालकांनी उस्फूर्तपणे दीडशे रिक्षाचा मोर्चा काढला. कल्याण शहरात निघालेला हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला.

आता पुढच्या टप्प्यात मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीचा उगम होणाऱ्या गावापासून तर गिरणा आणि तापी नदीचा संगम असलेल्या जळगावच्या गावापर्यंत असा उगम ते संगम प्रत्येक गावात बांधणी करण्याचा संकल्प आंदोलकांनी केला आहे.

त्यामुळे जळगाव अर्थात खानदेशच्या राजकारणावर त्याचा भावनिक परिणाम होऊ शकतो. तो भाजप आणि विशेषतः गेली अनेक वर्ष जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांना धक्का ठरू शकतो. त्यामुळेच सध्या मंत्री महाजन माजी खासदार पाटील यांच्यावर चांगलेच संतापलेले दिसतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नवी राजकीय कलाटणी चर्चेचा विषय आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT