MLC Election Maharashtra : राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 17 पैकी 8 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपला थेट फायदा करून देण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे.
उत्कर्षा रूपवते यांनी म्हटले आहे की, राज्यात विरोधकांची भूमिका बजावणारे काँग्रेस (Congress), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवार माघारी घेण्याचा निर्णय हा लोकशाही प्रक्रियेला बाधा आणणारा असून त्याचा थेट लाभ सत्ताधारी भाजपला होत असल्याचा दावा त्यांनी केला.
जनतेसमोर भाजपविरोधी (BJP) भूमिका मांडणारे पक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र वेगळीच भूमिका घेत आहेत. इतरांना ‘भाजपची बी-टीम’ म्हणणारे नेते आता स्वतःच भाजपची ‘ए-टीम’ बनल्यासारखे वागत आहेत, असा टोला रूपवते यांनी लगावला.
महाविकास आघाडीने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि भाजपला मदत होत असल्याची वस्तुस्थिती स्पष्टपणे मान्य करावी, अशी मागणीही त्यांनी केली. विरोधी पक्ष म्हणून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करताना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत मात्र सत्ताधाऱ्यांना लाभदायक ठरणारे निर्णय घेतले जात असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक निवडणूक लढविणे आणि मतदारांसमोर पर्याय उभा करणे आवश्यक असल्याचे सांगत, या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडी राज्यभर जनजागृती मोहीम राबविणार असल्याचेही रूपवते यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने केलेल्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.