

Ahilyanagar political news : अहिल्यानगर जिल्ह्याने राज्याच्या राजकारणात एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विधानसभेतील 12 आणि विधान परिषदेवरील 7 अशा एकूण 19 आमदारांसह अहिल्यानगर हा राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या आमदारसंख्येत आणखी भर पडली असून विधान परिषदेवर पोहोचणारे ते जिल्ह्यातील सातवे आमदार ठरले आहेत.
विशेष म्हणजे, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पाच तालुक्यांत प्रत्येकी दोन-दोन आमदार आहेत, तर कर्जत-जामखेड तालुक्याने तब्बल तीन आमदार देण्याचा अनोखा मान मिळवला आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकीय ताकदीची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने विधान परिषदेत (MLC Election) अहिल्यानगर जिल्ह्याचे आणखी एक प्रतिनिधित्व वाढले आहे. यापूर्वी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड), अमित गोरखे (श्रीगोंदा), सुनील कर्जतकर (जामखेड), विवेक कोल्हे (कोपरगाव), शिवाजीराव गर्जे (पाथर्डी) आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, असे सहा सदस्य जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत होते. आता तनपुरेंच्या निवडीने हा आकडा सातवर पोहोचला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून विधानसभेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा) आणि अक्षय कर्डिले (राहुरी), असे चार आमदार आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. किरण लहामटे (अकोले), आशुतोष काळे (कोपरगाव), काशिनाथ दाते (पारनेर) आणि संग्राम जगताप (अहिल्यानगर शहर) असे चार आमदार आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे शिवसेना विठ्ठल लंघे (नेवासा) आणि अमोल खताळ (संगमनेर), काँग्रेसचे हेमंत ओगले (श्रीरामपूर). तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार (कर्जत-जामखेड), असे एकूण 12 आमदार विधानसभेत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा तालुके सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत. पाथर्डीमध्ये मोनिका राजळे आणि शिवाजीराव गर्जे, कोपरगावमध्ये आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे, संगमनेरमध्ये अमोल खताळ आणि सत्यजित तांबे, श्रीगोंद्यात विक्रमसिंह पाचपुते आणि अमित गोरखे, राहुरीमध्ये अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे, असे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर कर्जत-जामखेड तालुक्याने वेगळाच विक्रम केला आहे. प्रा. राम शिंदे, रोहित पवार आणि सुनील कर्जतकर, असे तीन आमदार या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.
जिल्ह्यातील 19 आमदारांपैकी सर्वाधिक 9 आमदार भाजपचे आहेत. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 2, तर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि अपक्ष, असे प्रत्येकी 1 आमदार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा राजकारणात अहिल्यानगरचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय पुनरागमनाची संधी ठरली आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अक्षय कर्डिले यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर जवळपास दीड वर्षे ते कोणत्याही प्रमुख पदावर नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांनी राजकीय समीकरणे बदलत भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळाली आणि बिनविरोध निवडीमुळे ते पुन्हा विधान परिषदेवर पोहोचले. यामुळे दीड वर्षांनंतर तनपुरेंना आमदारकीची संधी मिळाली असून अहिल्यानगरच्या राजकारणात त्यांचे पुनरागमन ही सध्या चर्चेची मोठी बाब ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.