Prakash Ambedkar and Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: हरेगाव दलित युवकांना मारहाण प्रकरणी आंबेडकर - आठवले एकाच दिवशी घेणार पीडित कुटुंबियांची भेट

Srirampur : हरेगाव येथे चार दलित तरुणांना चोरीच्या आरोपाखाली मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार दलित तरुणांना चोरीच्या आरोपाखाली अर्धनग्न करून आणि झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. ही घटना उघडकीस येताच अनेकांनी संताप व्यक्त केला.

यानंतर विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे नेते पीडित युवक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. येत्या 1 सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि 'आरपीआय'चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हरेगावमध्ये येणार असून ते एकाच दिवशी पीडित युवक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी नानासाहेब गलांडे सध्या फरार आहे. तर या आरोपीच्या दहशतीखाली संपूर्ण परिसर असल्याचा आरोप सर्वस्थरातून होत आहे. या प्रकरणानंतर दोन्ही समाजाने सामाजिक सलोखा कायम ठेवत याला जातीय स्वरूप न देता गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगार असतो, अशी भूमिका घेत कडक कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाने श्रीरामपूर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या अनुषंगाने सध्या सर्वपक्षीय नेते, दलित संघटनांचे पदाधिकारी हरेगाव आणि पीडित उपचार घेत असलेल्या ठिकाणी भेटी देत आहेत. आता रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर हे देखील भेट घेणार आहेत.

आंबेडकर आणि आठवले यांची हरेगाव पीडितांना भेटण्याची तारीख 1 सप्टेंबरच असल्यामुळे याबद्दल चर्चा होत आहेत. आरपीआय आठवले गटाकडून केंद्रीय मंत्री आठवले यांची दिल्लीत महत्वाची बैठक असल्याने ते लवकरच येणार असल्याचे माध्यमांना कळवले होते. मात्र, रामदास आठवले हे सुद्धा 1 सप्टेंबरलाच दुपारी एक वाजेपर्यंत हरेगाव येथे येणार असल्याची माहिती आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर हे सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान तर आठवले एक वाजता हरेगावमध्ये येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांची राहुरीत अल्पसंख्याक आक्रोश सभा असून या सभेची 'वंचित'ने मोठी तयारी केली आहे. तर आठवले यांची शिर्डी अथवा श्रीरामपूरमध्ये पत्रकार परिषद होणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT