Nashik News: नाशिक मध्य मतदार संघ महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींमध्ये झालेल्या बंडखोरीने चर्चेत आहे. आता तो शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नाशिक मध्य मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांनाही आघाडी आणि युती यांच्या बंडखोरांना सामोरे जावे लागणार आहे.
या मतदारसंघात मुख्य लढत विद्यमान आमदार फरांदे आणि माजी आमदार गीते यांच्यात असेल. उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर माजी आमदार गीते यांनी सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे आगामी काळात प्रचारात आरोप, प्रत्यारोप होणार अशी चिन्हे आहेत.
यावेळी माजी आमदार गीते म्हणाले, गेल्या दहा वर्षात शहराच्या लोकप्रतिनिधींनी नाशिकची वाट लावली आहे. जनतेने आपल्या डोळ्याने हे पाहिले आहे. त्यामुळे जनता आता या `बडी भाभी`ला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
ते म्हणाले, मी गेली तीन महिने शहरात फिरत आहे. आपले नाशिक हे धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक शहर आहे. या शहराचे नेतृत्व या आमदारांना करण्याची संधी जनतेने दिली होती. मात्र या लोकप्रतिनिधींनी या विश्वासाला तडा दिला आहे.
नाशिक शहरातील महाविद्यालयाचे मुले, मुली ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. सबंध युवा पिढी बरबाद करण्याचे काम ड्रग्जच्या माध्यमातून झाले. नव्या पिढीला हे लोक कोणत्या दिशेने नेऊ इच्छीतात, हे सप्ष्ट दिसत आहे. ते आम्ही सहन करू शकत नाही.
या लोकांनी शहरात एखाद्या कारखाना आणला नाही. मात्र ड्रग्जचा व्यवसाय कसा वाढेल, विस्तारेल यासाठी योगदान दिले. या ड्रग्जच्या व्यवसायाचे धागेदोरे प्रामुख्याने नाशिक मध्य मतदार संघात होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
माजी आमदार गीते म्हणाले, जे आरोपी असतील त्यांना जामीनावर सोडविणे, त्यांना ड्रग्जचा पुरवठा करणे. विविध प्रकारची मदत करण्याचे काम या लोकप्रतिनिधींनी केल्याचे बोलले जाते. या संबंध प्रकाराला आम्ही शहराच्या या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरू.
गेले तीन महिने शहराच्या विविध भागात जाऊन मतदारांना भेटत आहोत. त्यात जनतेने आता परिवर्तन करायचे असा ठाम निर्धार केलेला दिसतो. शिवसेना उद्धव ठाकरे येत्या निवडणुकीत शहराला बरबाद करणाऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
नाशिक मध्य मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या काँग्रेसने बंडखोरी केली आहे. महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी देखील बंडखोरी केली आहे. या निमित्ताने शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार गीते यांनी पुन्हा जुने आरोप उकरून काढले आहेत. या निमित्ताने निवडणुकीतील मुद्दे काय? याचा एक संदेश जनतेला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.