Nashik News : राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या नाशिकसह पाच जागांसाठी सोमवारी (दि.३०) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदारसंघातील सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. गुरुवारी (दि.२) या मतमोजणी होणार असून मतदानराजा विजयाचा गुलाल उधळण्याची संधी नेमकी कुणाला देणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐनवेळी माघार घेतली होती. याचवेळी सत्यजित तांबेंनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. यावेळी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या,आजचा दिवस अतिशय महत्वाचा तर आहे पण जनतेचा विजय होणार आहे. आणि जनताच आमदार होणार आहे. कारण धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते सगळे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे विजय आपलाच आहे फक्त औपचारिकता बाकी आहे असा आत्मविश्वास शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी यावेळी बोलून दाखविला.
तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी फार चांगला आणि विचार करुन एक शिक्षक आणि पदवीधरचा विचार दिला होता. त्यांनी निश्चिपणे काहीतरी विचार केला आहे. शिक्षण हे वाघिणीच दूध आहे असं म्हटलं जातं. शिक्षक आणि जो पदवीधर आहे. त्याचं एक मत फार महत्वाचं आहे. त्यामुळे जिथे असेल तिथून मतदानासाठी पुढं या. पुढील सहा वर्ष तुम्ही कामाच्या रुपानं संबंधित आमदाराला हाताळू शकतात. यावेळी मतदान जास्त झाले पाहिजे. त्यामुळे धनशक्ती जिंकू देऊ नका, जनशक्ती जिंकून द्या असं आवाहनही शुभांगी पाटील यांनी केलं आहे.
भाजपचा तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा...
नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता ऐनवेळी माघार घेतली होती. याचवेळी सत्यजित तांबेंनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या तांबे पितापुत्रांच्या बंडखोरीची तातडीनं दखल घेत त्यांचं काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले. तर भाजपनं या ठिकाणी आपला उमेदवार न दिल्यामुळे भाजपचा तांबे यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.
''शतरंज का एक नियम बहुत उम्दा..''; विखेंची पोस्ट चर्चेत
नाशिकमध्ये भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र, नाशिक पदवीधरमध्ये भाजपने कोणालाच उमेदवारी दिली नाही. राजेंद्र विखे यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केले होते. पक्षाने त्यांना आधी मतदार नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली. त्यानंतर पक्षाने त्यांना उमेदवारी संदर्भात विचारणाच केली नसल्याची चर्चा सुरु आहे.
त्यानंतर राजेंद्र विखे पाटील यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''शतरंज का एक नियम बहुत उम्दा है, चाल कोई भी चलो पर अपनों को नही मार सकते!'' असे राजेंद्र विखे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मतदार संघात एकच चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.