Vijay Mallya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vijay Mallya 14000 crore recovery : मल्ल्याची 14 हजार कोटींची वसुली झाली, तरी गुन्हा रद्द नाही; RBI माजी संचालकांचा मोठा खुलासा

Vijay Mallya Recovery Does Not End Criminal Proceedings, Says Former RBI Director : कर्जाची रक्कम वसूल झाली तरी फौजदारी खटले मागे घेतले जात नाहीत; श्रीरामपुरात सतीश मराठे यांची माहिती

Pradeep Pendhare

Vijay Mallya bank loan : उद्योगपती विजय मल्ल्यांसारख्या बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर टाच आणून 14 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम वसूल झाली असली, तरी त्यांनी केलेला फसवणुकीचा गुन्हा रद्द होत नाही. त्याच्यावरील गुन्हेगारी खटले आजही चालूच राहतील, असा खुलासा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी संचालक सतीश मराठे यांनी केला.

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथील सिद्धिविनायक पतसंस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे उपस्थित होते.

बँका उद्योगपतींचे कर्ज माफ करतात, हा निव्वळ भ्रम असल्याचे सांगत मराठे म्हणाले की, बँक (Bank) एकाही सक्षम व्यक्तीचे कर्ज माफ करत नाही. व्यवसाय पूर्णपणे बुडाल्यास आणि वसुलीची शक्यता उरली नाही, तरच बँक आपले हिशेब पत्रक स्वच्छ ठेवण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या ती रक्कम ‘राईट ऑफ’ करते. परंतु, कायदेशीर वसुली आणि फौजदारी खटले मागे घेतले जात नाहीत. मल्ल्याच्या 15 हजार कोटींच्या थकबाकीपैकी 14 हजार कोटी वसूल झाल्यावर त्याने केस रद्द करण्याची मागणी केली होती; मात्र बँका व ईडीने ती फेटाळून लावली.

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारच्या काळात केवळ शैक्षणिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत अल्प प्रमाणात सोने तारण ठेवण्यात आले होते. तसेच बँक ऑफ इंग्लंड किंवा लंडनमध्ये साठवलेले आपले सोने अलीकडील काळात भारतासह (INDIA) जगभरातील अनेक देशांनी यशस्वीपणे मायदेशी परत आणले आहे, असा महत्त्वपूर्ण खुलासा मराठे यांनी केला.

अर्थव्यवस्था भक्कम

डॉलरचा दबाव असला, तरी भारताकडे 740 बिलियन डॉलरचा भक्कम परकीय चलन साठा आहे. परकीय मदत न मिळताही देश 11 महिने चालू शकतो. 2014 पूर्वी कमकुवत मानली जाणारी भारतीय अर्थव्यवस्था आज 7.8 टक्के विकास दरासह जगात पहिल्या पाचमध्ये आहे. इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 105 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले असले, तरी पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतातील महागाई नियंत्रणात आहे. ​डिसेंबरअखेर नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि रिलायन्सचे एक लाख कोटी रुपयांचे दोन आयपीओ बाजारात येत आहेत. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना चांगला फायदा होईल. मात्र, रोजच्या उलाढालीवर मर्यादा येऊ शकतात, असे ते म्हणाले.

जिल्हा बँकांचा विस्तार होणार

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्टर देण्यासाठी देशात आणखी 240 नवीन जिल्हा बँका स्थापन करून सहकार क्षेत्राचा विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गुजरात व राजस्थानमध्ये नवीन शाखा सुरू होत असल्याचे मराठे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT