Vilas Shinde, Eknath Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics : शिंदेंनी शिंदेंना गळाला लावायचं पक्क ठरवलंय, यावेळी डायरेक्ट घरासमोरच घेऊन गेले वाहनांचा ताफा

Vilas Shinde meets Eknath Shinde again : आठवडाभरात विलास शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे पक्षातरांच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिकमधील ठाकरे गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून स्फोटक घडामोडी घडत आहेत. शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटातील मोठ मोठे राजकीय नेते आपल्या गळाला लावण्याचे काम सुरु केले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आठवडाभरात विलास शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे पक्षातरांच्या चर्चांना अधिकच जोर आला आहे.

मागच्या सोमवारी (ता.२) विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. रविवारी ता. (५) शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, माजी आमदार नरेंद्र दराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांच्या घरी आयोजित विवाह सोहळ्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची पुन्हा धावती भेट घेतली.

उपमुख्यमंत्री शिंदे गंगापूर रोडने जात असताना ठाकरे सेनेचे महानगप्रमुख विलास शिंदे यांनी सोमेश्वरजवळ रस्त्यावरच उपमुख्यमंत्र्यांचे वाहन थांबवून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे लवकरच विलास शिंदे आता शिंदे सेनेत जातील अशा चर्चांना बहर आला आहे. या भेटीविषयी उपमुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वी विलास शिंदे यांच्या कन्येच्या लग्नाला आलो होतो. त्यामुळे ते आज मला भेटले, यात अडचण काय आहे. ते जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. मी लग्नाला आलो आहे. त्यामुळे याचा राजकीय अर्थ काढू नका, विलास शिंदे पक्षात नाराज आहेत का, याविषयी मला काहीही माहिती नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान विलास शिंदे यांनीही या भेटीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मी घरातून बाहेर पडत असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांचा वाहनांचा ताफा घरापुढून जाणार असल्याचे मला समजले. त्यामुळे आपल्या परंपरेनुसार मी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीतून कुणी इतर काही अर्थ काढत असेल तर त्याला मी काहीही करु शकत नाही असं विलास शिंदे म्हणाले.

दरम्यान, सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर विलास शिंदे यांच्या नाराजीचाही विषय बैठकीत निघाला होता. मात्र शिंदे यांनी ती पक्षीय कुटुंबातील अंतर्गत बाब असल्याने, माध्यंमासमोर जाहीर करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर बडगुजर यांच्या जागेवर दत्ता गायकवाड यांची उपनेतेपदी निवड झाल्यानंतर नाशिकधील सर्व प्रमुख पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. त्यात विलास शिंदे मात्र अनुपस्थित होते. मात्र तेच विलास शिंदे एका आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेंची भेट घेत असतील तर मग त्याचा अर्थ काय समजावा अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT