Nagar News : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना ही सीट भाजपची आहे, तुम्ही निवडणूक लढणार? या प्रश्नावर बोलताना दिलेले उत्तर चर्चेत आले आहे. 'कोणाला तिकीट देणार कोण कोठून लढणार याचे काही देणंघेणं नाही. आम्ही गळ्यात गमजे घालायचे. जय भाजप, जय भाजप करत घराघरात फिरायचे', असे विधान प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे.
चित्रा वाघ यांच्या उपस्थित नगर शहर आणि ग्रामीण भागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्या नगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही सीट भाजपची आहे, भाजपने सांगितल्यात तुम्ही निवडणूक लढणार, यावर चित्रा वाघ यांनी दिलेले झटपट उत्तराचा कोणता अर्थ निघतो, यावर नगरमध्ये राजकीय चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, धनश्री विखे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे,
चित्रा वाघ म्हणाल्या, 'निवडणूक लढवणे हे माझ्या अख्यारीत येत नाही. ते देवेंद्रजी ठरवणार. आमचे बावनकुळेजी ठरवणार. पक्षाचे अध्यक्ष, नेते ठरवतात. आमच्या सारखे कार्यकर्ते बघा, मी नगरमध्ये आले आहे. आज नगर शहरात आहे. पुढचे दोन दिवस नगर ग्रामीण भागात कार्यक्रम आहेत. त्यामुळे आमचे काम आहे, घराघरात जाणे. भाजप पोहोचवणे. कोणला तिकीट देणार, कोण निवडणूक लढवणार, आम्हाला त्याचा काही देणेघेणे नाही. आम्ही गळ्यात गमजे घालायचे. जय भाजप, जय भाजप करत घराघरात फिरायचे. मोदीजी आणि भाजपचा प्रचार करायचा, हे आमचे काम आहे'.
आमदार रोहित पवार नेहमीच म्हणतात की, भाजपने घरी फोडली, यावर चित्रा वाघ म्हणाल्या, 'जैसे बोते है, वैसा पाते है', घरं फोडणे हा विषयच नाही. ज्यांना वाटलं, वाटते, ते भाजपमध्ये येऊ शकतात. हा राज्याचा पक्ष नाही. राष्ट्रीय पक्ष आहे. जगातील मोठा पक्ष आहे. जे पक्षात येतील, त्याचे स्वागत केले जाते. जे पक्षात आले आहेत, ते त्यांच्या मर्जीने आले आहेत. देशाच्या विकासाला साथ देण्यासाठी आले आहेत. रोहित पवार यांनी भाजपकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या घरात लक्ष द्यावे. तशी गरज देखील आहे'.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार यांचे पुतणे शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. 'यावर पवार कुटुंब खूप मोठे आहे. त्यामुळे त्यांचे ते ठरवतात. कोण कोठे जाणार हा त्यांचा प्रश्न आहे', असेही चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार (Ajit Pawar) हे जिंकतील का?, यावर चित्रा वाघ यांनी प्रतिप्रश्न करत का नाही जिंकणार? नक्की जिंकणार! आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीत तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल. अजित पवारविरुद्ध सुप्रिया सुळे (Supriya sule), अशी लढत होईल का? यावर ते मला माहीत नाही, असे सांगून चित्रा वाघ यांनी त्यावर अधिक भाष्य करणे टाळले.
(Edited By : Sachin Waghmare)