Chitra Wagh: पक्षासाठी झटूनही चित्रा वाघांना संधी नाही; त्यासाठीच केली होती का आगपाखड ?

Bjp political News : भाजप कडून वाघ यांना विधान परिषदेवर संधी मिळाली नाही.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : यापुढे केवळ पक्षासाठी झटणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनाच निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, अशा शब्दांत भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी धुळे येथील कार्यक्रमात महिला पदाधिकांऱ्यांची कानउघाडणी केली होती. कार्यक्रमाला महिलांची गर्दी न झाल्याने चित्रा वाघ पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांवर संतापल्या होत्या. शिवाय पक्षासाठी काम कराल तरच पुढे संधी मिळणार असल्याची तंबीही त्यांनी दिली. रस्त्यावर उतरून आंदोलने करूनही विधान परिषदेची हुकलेली संधी आगामी विधानसभा निवडणुकीत तरी मिळावी, याकडे लक्ष वेधण्यासाठी तर चित्रा वाघ यांची ती आगपाखड नव्हती ना? अशी चर्चा आता रंगली होती.

चित्रा वाघ या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादी सोडल्यानंतर काही काळातच त्यांनी भाजपमध्ये आपले स्थान मजबूत केले. महिला मोर्चाची कमान सांभाळताना चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तर वाघ यांनी छोट्या-मोठ्या गुन्ह्यांतदेखील सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पूजा चव्हाण प्रकरणात तर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी त्यांनी रान उठवले होते. त्यावेळी वाघ या विरोधी पक्षात होत्या. मात्र, आता शिंदे गटासोबत संजय राठोडही सत्तेत दाखल होताच वाघ यांचा राठोड यांना असलेला विरोध मावळला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chitra Wagh
Success Story : याला म्हणतात जिद्द,.. मातीच्या घरात राहणारा माणूस झाला आमदार

दुसरीकडे स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फेसबुक लाइव्ह सरकार म्हणून टीकेची छोड उठवण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. महाविकास आघाडी सत्तेत असताना चित्रा वाघ यांनी कोरोना, अनिल देशमुख यांचे तथाकथित 100 कोटींचे वसुली प्रकरण, अमली पदार्थांचे छोटे-मोठे गुन्हे, महिला अत्याचाराच्या घटना यावरून सातत्याने सरकारला आणि गृहखात्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी महाविकास आघाडीतील पक्षांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत पक्षनिष्ठा सिद्ध केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सरकारला जाब विचारताना चित्रा वाघ यांनी रावणाला मदत करणारी शूर्पनखा या पदावर बसवू नका म्हणत रूपाली चाकणकर यांच्यावरही बोचरी टीका करत निशाणा साधला होता. एवढेच नाही तर प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, मोठ्या ताई म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावरदेखील आक्रमक भाषेत निशाणा साधून आपण भाजपमध्ये रुळलो असल्याचे दाखवून दिले.

Chitra Wagh
Kiran Lohar : स्कॅमर लोहार गुरुजींची भ्रष्टाचाराची रंजक कथा तुम्हाला माहिती आहे का ? ....

चित्रा वाघ यांची संधी हुकली-

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतःला पक्ष कार्यात झोकून दिले. पुढे भाजपनेही त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षसंघटनेतील महिला मोर्चाच्या विविध जबाबदाऱ्या दिल्या. सध्या त्यांच्याकडे महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद आहे. परंतु 2022 मध्ये भाजपने पाच जणांना विधान परिषदेवर संधी दिली, त्यात चित्रा वाघ यांचे नाव नव्हते. पिंपरी-चिंचवडच्या उमा खापरे यांनी बाजी मारली. त्यानंतर शिंदे-फडणवीस युती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वाघ यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ते प्रकरण अद्यापही निकाली निघाले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या रिक्त अध्यक्षपदाकडेही लक्ष वेधत रूपाली चाकणकरांचे नाव आघाडीवर येताच शूर्पनखा म्हणून टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतरही त्यांनी महिला आयोगावर सातत्याने टीका केली होती. यातून त्यांची महिला आयोगाचे अध्यक्ष होण्याची इच्छा लपून राहिली नव्हती.

Chitra Wagh
Winter Session Maharashtra : सुपारी, संत्र्यांची माळ गळ्यात घालून सरकारचा विरोध 

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

धुळे येथे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये महिला मेळाव्याला अपेक्षित गर्दी न झाल्यामुळे संतप्त झालेल्या वाघ यांनी महिला पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यांनी शिरपूर, साक्री, शिंदखेडा येथून किती महिला उपस्थित आहेत, अशी विचारणा केली. त्या वेळी मोजक्याच महिलांनी हात उंचावल्याने वाघ संतापल्या. व्यासपीठावर उपस्थित प्रत्येक महिला पदाधिकाऱ्याने किमान 25 महिला कार्यकर्त्या आणल्या असत्या, तर सभागृह भरले असते, अशी खंतही व्यक्त केली होती. पक्षात पदे हवी असतील तर रस्त्यावर उतरून पक्षाचे काम करावे लागेल. यापुढे केवळ पक्षासाठी झटणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनाच निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल, त्यासाठी कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागेल, असेही त्या म्हणाल्या होत्या. मात्र, भाजपमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यातच वाघ यांनाच आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत संधी मिळालेली नाही.

Chitra Wagh
Udayanraje Breaking News : जरांगे पाटलांच्या भेटीसाठी निघालेल्या उदयनराजेंचा दौरा तडकाफडकी रद्द; चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com