Suresh Jain & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sureshdada jain news; कट्टर विरोधक एकनाथ खडसे भेटीत काय होईल?

सुरेशदादा जैन यांच्या एन्ट्रीने जळगावच्या राजकारणाला नवा टर्न मिळेल

Sampat Devgire

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : सुरेशदादा जैन (Sureshdada Jain) यांची जळगाव (Jalgaon) शहरात एन्ट्री झाली आणि कार्यकर्त्यांचा उत्साहाला शिगेला पोचला. शहरातील दिग्गज नेते, पूर्वाश्रमीचे सहकारी दादांना भेटायला येऊ लागले. आता सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या भेटीची प्रतीक्षा आहे. पूर्वीचे राजकीय विरोधक आता मित्र असतील. त्यामुळे राजकीय चित्रदेखील (Jalgaon Politics) वेगानं बदलण्याची शक्यता आहे. (Supporters eager to know political direction in Jain & Khadse meeting)

सुरेशदादांनी कितीही शांत, स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा मूळ स्वभाव बंडखोरीचा आहे. त्यांच्यातील राजकीय समयसूचकता वाखाणण्याजोगी आहे. आता पुढच्या काळात निवडणुका होईपर्यंत सुरेशदादा हेच केंद्रस्थानी राहतील. अशोकभाऊ जैन आपले राजकीय वारसदार असतील, जळगावात आल्याआल्या हे वक्तव्य करून अनेक राजकीय पावसाळे आपण पाहिलेले असल्याचं जणू दादांनी स्पष्ट केलंय.

राजकीय नेतृत्वाच्या अभावानं जळगाव शहराची झालेली वाताहत लोक अनुभवत आहेत. रस्ते हा जळगाव शहरातील कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे आता दादांच्या झंझावाताची अपेक्षा आहे. आमदार सुरेश भोळे यांच्यावर रस्त्यांचं खापर फुटणार, हे स्पष्ट आहे. महापालिकेतील कमांड हाती घेऊन रस्ते वेगानं चांगले करण्याच्या सूचना सुरेशदादा देतील, त्यातून रस्त्यांची कोंडी फुटू शकेल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. अनेक काळापासून महाजन-खडसे वाद आणि गुलाबरावांच्या अनावश्यक टोमण्यांना लोक कंटाळले आहेत. पुढच्या निवडणुकीवर दादांची छाप असेल. दादा म्हणतील, तो उमेदवार शहरातून असेल. अनेक इच्छुक असले तरी नितीन लढ्ढा आणि विष्णू भंगाळे हे प्रबळ दावेदार असतील. 

अशोकभाऊ जैन यांच्या नावाचा राजकीय वारसदार असा उल्लेख करून दादांनी चांगलीच गुगली टाकली आहे. अनेक लोक बुचकाळ्यात पडले, तर काहींना ते खरंही वाटू लागलंय. लोकांना थोपवून ठेवण्यासाठी दादांची ही गुगली असावी. अशोकभाऊ हे कुठल्याही परिस्थितीत राजकीय मैदानात उतरणार नाहीत. मोठे भाऊ अर्थात, भंवरलालजींचा सक्रिय राजकारणाला सक्त विरोध होता. यापूर्वीही अशोकभाऊंच्या नावाची राजकीय चाचपणी झाली आहे. एका विधान परिषद निवडणुकीवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशोकभाऊंच्या नावाला तत्काळ संमती दिली होती. दादांचा तेव्हाही अशोकभाऊंसाठी आग्रह होता. तेव्हा मोठ्या भाऊंनी दादांना विचारलं होतं, तुमच्या गाडीला चाकं किती? दादा म्हटले चार... मोठे भाऊ पुढं म्हणाले, माझ्याही व्यवसायाची चार चाकं आहेत, ती म्हणजे माझी चारही मुलं. एक चाक निखळलं, तर मी रिक्षा चालवायची का? पुढे शरद वाणी विधान परिषदेचे आमदार बनले. स्वतः अशोकभाऊदेखील राजकीय विचारसरणीचे नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात येण्याची अशोकभाऊंची शक्यता धूसर नव्हे, तर अशक्य आहे. मात्र, दादांचं हे वक्तव्य पुढचं राजकारण सोप नसेल, हे दर्शवणारं नक्कीच आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं चित्र काय असेल, यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जळगावची जागा राष्ट्रवादीकडे असायची. आता महाविकास आघाडी झाल्यास समीकरण बदलेल. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जळगाव शहरात यश मिळालेलं नाही. भाजपचा मुकाबला करायचा झाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गट हाच प्रबळ प्रतिस्पर्धी असेल. मात्र त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीची प्रबळ साथ मिळायला हवी. जळगाव ग्रामीणचा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाऊ शकतो. तिथे राष्ट्रवादीला काँग्रेस, शिवसेनेची गरज भासेल. एकूणच काय तर सुरेशदादांच्या आगमनामुळे राजकीय हालचाली अत्यंत गतिमान झाल्या आहेत. सध्या रस्ते खराब असले तरी दादा परत आलेत, या घडामोडींमुळे अनेकांना सुखावल्यासारखं वाटू लागलंय. आशादायी चित्र निर्माण झालंय.  

(ता. क. अलीकडेच एकनाथ खडसे यांची एक क्लीप व्हायरल झाली होती. त्यात रस्ते फावड्यानं खोदले जात आहेत, असं वक्तव्य खडसेंनी केलं. सुरेशदादांच्या काळात अशी अवस्था कधीही नव्हती, दादांना त्यांचे मार्क द्यावे लागतील, असंही नाथाभाऊंनी म्हटलंय.)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT