Deepika Chavan
Deepika Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News: बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात; सरकार आहे कुठे?

Sampat Devgire

सटाणा : बागलाण (Satana) तालुक्‍यात गेल्या दोन महिन्यांपासून सरासरीपेक्षा २०० टक्के (Heavy rainfall) जास्त पाऊस पडला आहे. मोसम खोऱ्यात तर ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब, मका, कांदा, भाजीपाला या नगदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे पावसाने (Rain affcted Farmers) होत्याचे नव्हते केलं आहे. राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण (Deepika Chavan) यांनी केली आहे. (Deepika chavan sende letter to Cheif Minister Eknath Shinde)

त्या म्हणाल्या, बागलाण तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी.

मागणी संदर्भात निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिल्या आहेत. निवेदनात, बागलाण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस सुरू असून, आतापर्यंत सरासरी २०० टक्क्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तालुक्‍यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हजारो हेक्टरवरील शेतीक्षेत्राचे नुकसान झाले असून, शेतातील मातीही वाहून गेली आहे. या पावसामुळे हजारो हेक्टरवरील द्राक्ष, डाळिंब, मका, कांदा यांसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

बागलाणच्या आदिवासी पश्‍चिम पट्ट्यातही सातत्याने सुरू असलेल्या संततधारेमुळे पिके सडल्याने आदिवासी शेतकरीही प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र अजूनही कृषी व महसूल विभागाकडून तालुक्‍यात नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झालेले नाहीत. अगोदरच पीककर्जामुळे कर्जबाजारी झालेला बागलाणचा शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. कर्जबाजारी झाल्याने आधीच हतबल झालेला बळीराजा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, आता निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेत आहे.

बागलाण तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे नैराश्यात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे प्रकार अवलंबू नये, यासाठी सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे तालुक्यात सरासरी पेक्षा २०० टक्के जास्त झालेल्या पावसात नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सरसकट पंचनामे करण्यासाठी कृषी व महसूल विभागाला तातडीने आदेश द्यावेत, तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्‍टरी एक लाख रुपये तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT