Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar News : पवारांच्या दौऱ्याने तरी दिंडोरीच्या रस्त्यांचे भाग्य उजळेल ?

Sampat Devgire

Ajit Pawar News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिंडोरी, कळवणच्या दौऱ्यावर येत आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधानसभेचे उपसभपती तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री करतात. मात्र, येथील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. पवारांच्या दौऱ्याने या रस्त्यांचे भाग्य उजळेल का?, असा प्रश्न आहे. (Dindori constituency bad road conditions)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिकच्या (Nashik) दौऱ्यावर येत आहेत. आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी त्यांचा हा दौरा आहे.

या मतदारसंघातील वणी गडावर जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी तसेच गुजरात राज्याला जोडणारा कळवण रस्ता अनेक वर्षे अतिशय खराब अवस्थेत आहे. शेतकरी व नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. जिल्ह्याला जोडणारा हा रस्ता अतिशय कमी रुंदीचा आहे. तो खासगी कंपनीला 'हायब्रीड ॲन्युटी प्रोग्राम'अंतर्गत नूतनीकरण व २०३१ पर्यंत देखभाल, दुरुस्तीसाठी दिला आहे. मात्र, रस्त्याचे पुरेसे रुंदीकरण झालेले नाही. देखभाल, दुरुस्तीही होत नाही. अजित पवार वाहनाने या रस्त्याने प्रवास करणार असून, त्यांनाही या रस्त्याची स्थिती पाहायला मिळेल.

या दौऱ्यानिमित्त दिंडोरी तालुक्यातील मंजूर असलेल्या, पण निधीअभावी रखडलेल्या रस्त्यांना निधी मिळणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या पाठपुराव्याने दिंडोरी तालुक्यातील विविध रस्त्यांची कामे मंजूर झाली. कामे सुरूही झाली. मात्र, यातील अनेक कामे रखडली आहेत. पाऊस उघडताच रस्त्यांची कामे सुरू होतील, अशी आश्वासने दिली जात असली तरी कामे सुरू करण्याबाबत सांशकता व्यक्त होत आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर काही कामांना स्थगिती मिळाली आहे. दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींबाबत जनतेत रोष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून केवळ विकासाचे स्वप्न व दावा करीत ही सर्व मंडळी सत्तेत सहभागी झाली. या नेत्यांना पदे मिळाली, त्यांच्यावरील चर्चा असलेल्या खटले व चौकशी यातूनही त्यांची सुटका होऊ शकेल. मात्र, यामध्ये जनतेला काय मिळाले? याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT