Sanjay Raut & Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : भुजबळांपाठोपाठ नाशिकचे दादा भुसेदेखील ‘ईडी’च्या रडारवर येणार?

Sampat Devgire

Shivsena v/s Dada Bhuse Case : नाशिकचे छगन भुजबळ यांच्याविषयी ‘ईडी’कडे तक्रार झाली होती. त्याची मोठी झळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बसली. आता नाशिकचे दुसरे मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचीही तक्रार ‘ईडी’कडे केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांनंतर भुसे यांचे नाव या यादीत येईल काय, याची चर्चा आहे. (Shivsena aggressively took a follow up on Minister Dada Bhuse)

गेल्या काही दिवसांत नाशिकचे (Nashik) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि शिवसेनेतील (Shivsena) राजकीय वाद टोकाला गेला आहे. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘ईडी’कडेदेखील तक्रार केली आहे, असे राऊत म्हणाले.

दादा भुसे हे सामान्यतः लो प्रोफाइल नेते मानले जातात. ते शक्यतो ‘आपले काम’ शांतपणे करतात. आपला उद्देश कसा साध्य करायचा यावर त्यांचे लक्ष असते. राजकीय बातमी त्यांच्याकडून कधीच मिळत नाही. कोणत्याही विषयात ते ‘मी लहान कार्यकर्ता आहे’ असे सांगून वेळ मारून नेतात.

मात्र, आता त्यांच्या मतदारसंघातच शिवसेनेने अद्वय हिरे यांच्या माध्यमातून अतिशय प्रबळ पर्याय उभा केला आहे. त्यामुळे मालेगावच्या राजकारणाला गती आली आहे. या कालावधीत हिरे यांनी भुसे यांच्यावर गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले आहेत.

याबाबत दादा भुसे यांनीदेखील कायद्याचा आधार घेत शिवसेना नेते राऊत यांच्यावर खटला दाखल केला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापले. राऊत गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, की भाजपचे प्रमुख नेते व शिवसेनेतून शिंदेंचे गटात गेलेले काही मंत्री यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, ती सरकारला खरंच करायची असेल, तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचा प्रथम राजीनामा घेतला पाहिजे.

भुसे यांनी शेतकऱ्यांच्या पैशातून १७८ कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. मी आरोप केल्यावर त्यांनी मला नोटीस पाठविली. भुसे यांनी कितीही खटले दाखल केले, तरी हे प्रकरण लपून राहणार नाही. यासंदर्भात ‘ईडी’कडेही तक्रार केली आहे. सध्या त्यांच्यावर कारवाई होणार नसली तरी २०२४ मध्ये त्यांच्यावर नक्की कारवाई होईल, असा दावा राऊत यांनी केला. त्यामुळे या विषयावरील राजकारण आणखी काही दिवस तापलेलेच राहण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT