Sujay Vikhe patil, Prajakta Tanpure Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure News : विखे पिता-पुत्राला सल्ला देताना तनपुरेंनी जगताप, कर्डिलेंना डिवचले

Pradeep Pendhare

Nagar News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन जवळपास सव्वा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही.

महाविकास आघाडीचे उमेदवारी माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या गुंडगिरी आणि दहशतीवर विखे पिता-पुत्रांकडून (Sujay vikhe) सातत्याने आरोप होत आहेत. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यावरून मंत्री विखेंवर निशाणा साधला. 'नगर शहरातील एसपी आॅफिस फोडले होते. त्यांचे चिरंजीव त्यांना घेऊन फिरत आहेत. मिरवणुकीत त्यांचेच फोटो नाचवले गेले. याबद्दल अगोदर त्यांनी आत्मपरीक्षण करावे', असा टोला आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे. (Prajakt Tanpure News)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी अगदी साध्यापद्धतीने उमेदवारी अर्ज भरला. हा अर्ज भरताना आमदार प्राजक्त तनपुरे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री विखेंकडून माजी आमदार लंकेंवर पारनेरमधील गुंडगिरी आणि दहशतीवर सातत्याने आरोप होत आहे. यावर आमदार तनपुरे यांनी मंत्री विखेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे सासरे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव घेता सर्वच काढले.

आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, 'मंत्री विखे यांचे चिरंजीव सध्या कोणत्या लोकांना घेऊन फिरत आहेत. काल मिरवणुकीत ज्यांचे फोटो नाचवले गेले, त्यांच्याबद्दल अगोदर आत्मपरीक्षण करावे. आपण ज्या लोकांना घेऊन फिरतोय, विशेषतः नगर तालुका आणि नगर शहरामध्ये, त्यांच्याविषयी लोकांचे त्यांच्याकडे बघण्याचा काय मत आहे. हे तपासून बघावे. कोणाची दहशत आहे. कोण कशातील आरोपी आहे. कोणी एसपी ऑफिस फोडले होते. नगर तालुका आणि नगर शहरात कोणाची दहशत आहे. त्याविषयी आत्मपरीक्षण करावे. मग समोरच्या विषयी बोलावे.'

जी व्यक्ती सर्वसामान्यांच्या सुख, दुःखाला धावून जाते. त्याला दहशत कशी म्हणावी. त्यांच्या पण काही क्लीप आहेत. त्यांच्यात पक्षाच्या खासदाराला धमकी दिल्याची क्लीप आहेत. आपण दहशतीवर बोलावे हे दुर्दैव आहे, असेही आमदार तनपुरे यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देशात हुकुमशाहीच्या रावणाचे दहन येत्या चार जून देशातील जनता करेल. निश्चितपणे मोठा पराभव एनडीएचा होईल. सत्तेतील लोकांना ग्राऊंडवरची भावना माहिती नाही. परंतु जो जनभावना समजावून घेतो, त्यालाच ग्राऊंडवरील परिस्थिती लगेच कळते, काय होईल ते! महाविकास आघाडीच्या राज्यात कमीत कमी 30 जागा येतील. मी जनमताचा कानोसा घेऊन निरीक्षण नोंदवत आहे, असेही प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

राज्यासह देशात एनडीएविषयी रोष आहे. राज्यात फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीचा लाट. शेतमाल आणि दुधाला भाव नाही. शेतकरी नाराज आहे. महाविकास आघाडीने दिलेले उमेदवार सर्वसामान्य आहेत. या सर्व बाजूने विचार केल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा देखील प्राजक्त तनपुरे यांनी केला.

(Edited by : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT